मुंबई - संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूचाल आला आहे. आता महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर देखील गंभीर आरोप झाले आहेत. एका महिलेने या मंत्र्यावर विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप केला आहे, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे.
धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर महायुती सरकारसाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर संताप व्यक्त करताना सांगितले की, “राज्यात एका मंत्र्याने महिलेला विवस्त्र फोटो पाठवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश असणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी बाजू आहे.”
हेही वाचा : तुम्ही गप्प बसा, बोलू नका, गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना झापले
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “महिला सुरक्षेच्या गप्पा मारणारेच जर असे प्रकार करत असतील, तर सरकारला लाज वाटली पाहिजे. या मंत्र्याचे नाव जाहीर करावे आणि त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी,” असे त्यांनी म्हटले आहे.या प्रकरणावर सत्ताधारी पक्षाकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, विरोधकांनी हा मुद्दा विधिमंडळात उचलून धरण्याचे संकेत दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “महाराष्ट्राला असे विकृत मंत्री नको. जर असे मंत्री मंत्रिमंडळात असतील, तर सरकारने त्यांना तात्काळ दूर केले पाहिजे. महाराष्ट्रात चांगले आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते नाहीत का? सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे.”
महायुती सरकारला आधीच अनेक आरोपांचा सामना करावा लागत असताना हा नवा वाद त्यांच्या अडचणी वाढवणारा ठरणार आहे. सरकार यावर काय पावले उचलते आणि संबंधित मंत्र्यावर कारवाई होते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.