नाशिक: दिवसेंदिवस राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असून थांबायचं नाव मात्र काही केल्या थांबेनात. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका कौटुंबिक वादातून पतीने चक्क पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संतापजनक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. केदार हंडोरे या तरुणाने पत्नी स्नेहल शिंदे (वय: 19) आणि सासू अनिता शिंदे (वय: 38) यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून घरासह त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.
घरात घुसून केदार हंडोरेने केला हल्लाबोल:
पत्नी स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे झोपेत असताना केदार हंडोरेने घरात घुसून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये, पत्नी स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे गंभीरपणे भाजून जखमी झाल्या.
पत्नी 50% तर सासू 65 % भाजल्या:
पत्नी स्नेहलचे शरीर 50% भाजले गेले तर सासू अनिता शिंदे यांचे शरीर 65% भाजले गेले. विशेष बाब म्हणजे, या थरारक घटनेमध्ये स्वतः केदार हंडोरे हा देखील भाजून गंभीर जखमी झाला आहे.
गावकऱ्यांनी केला आग विझवण्याचा प्रयत्न:
या घटनेची माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न करता गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. सोबतच, गावकऱ्यांनी या घटनेबद्दलची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर, रुग्णवाहिकेतून तत्काळ तिघ्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या पत्नी स्नेहल आणि सासू अनिता यांच्यावर नाशिकमधील खासगी श्रीजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 'सध्या त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे', अशी माहिती डॉक्टरांनी दिली. तर केदार हंडोरेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात या घटनेचे कारण स्पष्ट झाले:
या घटनेमागील खरं कारण म्हणजे कौटुंबिक वाद कारणीभूत होता असे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले.
लग्नाच्या काही दिवसात दोघांमध्ये वाद-विवाद:
केदार आणि स्नेहल यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र कौटुंबिक वादातून दोघांमध्ये सतत वाद होत होते. नंतर याच वादाचे रूप इतके भयानक होईल, याची कल्पना कुणालाही नव्हती. पत्नी आणि सासूला जाळल्यानंतर, पती केदारने स्वतःच्या शरीरावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला.
पीडितांच्या जबाबांच्या आधारे आरोपीवर होणार कारवाई:
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. त्यानंतर, पोलिसांनी आरोपी केदारवर गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस पुढील तपास करत असून पीडितांच्या जबाबांच्या आधारे केदार हंडोरेवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. ही घटना म्हणजे घरगुती वाद कसा टोकाचा वळण घेऊ शकतो याचे भयावह उदाहरण आहे. एक नवविवाहित तरुणी आणि तिच्या आईच्या जीवनावर अंधार पसरवणाऱ्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. समाजात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अधिक सजगतेची गरज निर्माण झाली आहे.