पुणे : 'माझ्या मुलाने अजून नीट जग सुद्धा पाहिलेलं नव्हतं.. त्याने कुणाचं काय बिघडवलं होतं?' असा सवाल करत आयुष कोमकरच्या आईने हंबरडा फोडला. 'येत्या नोव्हेंबरमध्ये त्याचा वाढदिवस होता..' सांगता सांगता आयुषच्या आईला हुंदका आवरेना. काही दिवसांपूर्वीच आयुष कोमकर याची राहत्या इमारतीच्या खालीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुषला त्याच्या घराच्या खालीच गाठून दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. पुण्याच्या नाना पेठ येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्याला मोठा हादरा बसला आहे.
'मी या लोकांच्या घरात जन्माला आले, याचीच मला लाज वाटतेय.. एखाद्या गरिबाच्या घरात जन्माला आले असते, तर नक्कीच यापेक्षा सुखी राहिले असते. एवढी श्रीमंती असून आता काय उपयोग..,' आयुषच्या प्रत्येक आठवणीने त्याच्या आईच्या डोळ्यांतलं पाणी थांबत नाहीये.. 'ही सर्व मोठ्यांची भांडणे होती. त्यात माझ्या मुलाचा काय दोष होता? मोठ्यांनी आपली आपण ती भांडणे सोडवायची होती..,' असे म्हणत आयुष आई हताश झाली आहे.
हेही वाचा - Ayush Komkar: सुडाच्या भावनेतून आयुषला संपवलं, मामा वनराज आंदेकरचा खून कसा झाला?
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या केली. पुण्याच्या नाना पेठ येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये कोमकर कुटुंब राहत असलेल्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये आयुष कोमकरवर दोघांनी गोळ्या झाडल्या. या प्रकरणी मुख्य आरोपी बंडू आंदेकरांसह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी बंडू आंदेकर हे आयुष कोमकरचे आजोबा असून आजोबांवरच नातवाची हत्या केल्याचा प्रमुख आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणाची कोर्टात सुनावणी झाली असता, बंडू आंदेकरने मुलीने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच, आम्हाला खोट्या प्रकरणात गुंतवलं आहे, आम्ही केरळला होतो, असा दावा केला आहे. तसेच, 'नातू आयुष याची हत्या करून मला काय मिळणार होतं,' असं बंडू आंदोकरचं म्हणणं आहे. तसेच, घरगुती वादांमुळे आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Vanraj Andekar Murder Case: माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा सूड; आरोपीच्या मुलाची गोळ्या घालून हत्या; टोळीयुद्धामुळे पुण्यात घबराट
आयुष्य कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरसह सहा जणांना 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु हे सहा आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. तर, मागील वर्षी झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येप्रकरणी मृत आयुष कोमकर याचे वडील गणेश कोमकर अटकेत आहेत.