Monday, September 01, 2025 06:08:18 PM

बोरिवलीत ४ वर्षीय मुलीचा विनयभंग ; 55 वर्षीय नराधम अटकेत

बोरीवलीत 4 वर्षाच्या मुलीवर अश्लील चाळे; आरोपी ललित यादवला अटक, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

बोरिवलीत ४ वर्षीय मुलीचा विनयभंग  55 वर्षीय नराधम अटकेत

मुंबई:  शहरात पुन्हा एकदा लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोरीवली परिसरात अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीबरोबर  55 वर्षीय नराधमाने अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी ललित यादव याला पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो पोलिस कोठडीत आहे.

ही घटना बोरीवलीच्या एका रहिवासी इमारतीत घडली. पीडित चिमुकली सोसायटीतच आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. आरोपी ललित यादव हा त्या परिसरातील रहिवासी असून, त्याने मुलीला थंड पाणी देण्याचं आमिष दाखवत घरात बोलावलं आणि तिच्याशी अश्लील चाळे केले.

मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल करताच आरोपीला लगेच अटक केली आणि पुढील चौकशी सुरू केली. आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत आणि भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट; तापमान 41 अंशांवर

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, रहिवाशांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आपल्या सोसायटीतच जर असे नराधम असतील, तर आपल्या मुली सुरक्षित कुठे राहणार? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या घटनेने पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आणला आहे. पालकांनी आपल्या मुलांशी खुलेपणाने संवाद साधावा, त्यांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल माहिती द्यावी, असं तज्ज्ञांचं मत आहे.

सोसायटी आणि शाळांमध्येही मुलांच्या सुरक्षेसाठी जागरूकता मोहीम राबवणं ही आजच्या काळाची गरज आहे. अशा प्रकारांच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणं आवश्यक आहे.
 


सम्बन्धित सामग्री