Sunday, August 31, 2025 02:08:40 PM

शहाळे महोत्सवात दगडूशेठ गणपतीला 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य; भाविकांनी मागितले आरोग्यसंपन्न भारताचे वरदान

पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात वैशाख पौर्णिमेनिमित्त 5000 शहाळ्यांचा नैवेद्य अर्पण; आरोग्य, पावसासाठी आणि देशहितासाठी विशेष प्रार्थना.

शहाळे महोत्सवात दगडूशेठ गणपतीला 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य भाविकांनी मागितले आरोग्यसंपन्न भारताचे वरदान

पुणे: वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आगळावेगळा शहाळे महोत्सव पार पडला. यामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला तब्बल 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. या विशेष नैवेद्याच्या माध्यमातून भाविकांनी वैशाख वणव्यापासून देशवासीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळाचे संकट टळावे आणि भारत आरोग्यसंपन्न व्हावा, अशी प्रार्थना गणपती चरणी केली.

या अनोख्या महोत्सवाचे आयोजन करण्यामागे उद्देश होता की, शेतकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात, पाण्याचे दुर्भिक्ष मिटावे आणि संपूर्ण देशात समाधानाचे व निरोगी वातावरण निर्माण व्हावे. शहाळे हे शुद्ध आणि आरोग्यदायी पेय असल्याने त्याचा नैवेद्य म्हणून उपयोग करून आरोग्यदायी भारताची प्रार्थना करण्यात आली.

हेही वाचा: Buddha Purnima 2025: बुद्धांचे अमूल्य विचार, शुभेच्छा, प्रेरणादायक संदेश आणि या दिवसामागील कथा जाणून घ्या..

मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने, दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी मंदिरात पाहायला मिळाली. हजारो लोकांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व आपल्या कुटुंबासाठी आणि देशासाठी चांगल्या आरोग्याची, सुख-समृद्धीची मागणी केली.

गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आलेले शहाळे नंतर समाजातील गरजू नागरिकांना वाटण्यात आले. यामध्ये वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि रुग्णालयांतील रुग्णांचा समावेश होता. त्यामुळे हा महोत्सव केवळ धार्मिक नव्हता, तर सामाजिक दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरला.

दगडूशेठ गणपती मंदिराच्या विश्वस्त मंडळाने यंदाचा शहाळे महोत्सव आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी समर्पित केला असून पुढील वर्षी हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

या शहाळे नैवेद्य महोत्सवामुळे पुणे शहरात एक वेगळाच अध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा पसरली असून, भाविकांच्या मनात गणपती बाप्पावरचे प्रेम आणि श्रद्धा अजून दृढ झाली आहे.


सम्बन्धित सामग्री