कल्याण: आज पितृपक्षाची समाप्ती होत असून सोमवारपासून (22 सप्टेंबर) शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. पुढील 9 दिवस सर्वत्र देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाईल. नवरात्रीमध्ये घटस्थापनेला फार महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये घटस्थापना केली जाते. परंतु, यंदा वाढलेल्या महागाईचा घटस्थापनेवर देखील परिणाम दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीच्या सुरुवातीला घटस्थापनेसाठी लागणाऱ्या लाकडी बांबूच्या टोपल्यांना खूप मागणी असते. मात्र यंदा झालेल्या सततच्या पावसामुळे टोपल्यांना बुरशी लागली आहे. त्यामुळे, ग्राहक टोपल्या खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याऐवजी प्लॅस्टिकच्या टोपल्यांना प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे विक्रेत्यांपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे.
हेही वाचा: Happy Navratri Wishes : नवरात्रीनिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा 'या' शुभेच्छा
नवरात्र उत्सवात घटस्थापनेसाठी वर्षानुवर्ष बांबूपासून तयार केलेल्या टोपल्यांचा वापर केला जातो. घटस्थापनेच्या दिवशी बांबूच्या टोपलीत माती भरून त्यात गहू, तांदूळ, मूग यांसारख्ये पाच प्रकारचे धान्य पेरण्याची परंपरा आहे. नऊ दिवसांच्या कालावधीत याला अंकुर फुटतात. त्यामुळे नवरात्रीच्या काळात बांबूच्या टोपल्यांना मागणी असते. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी कल्याणमध्ये मनमाड, नाशिक आणि मुंबई येथून टोपल्या विक्रीसाठी आणल्या जातात.
दरम्यान, टोपल्यांच्या दरात 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 18 रुपयांना विकली जाणारी टोपली यंदा 32 रुपयांपर्यंत विकली जात आहे. सर्वात मोठी टोपली 400 रुपयांना विकली जात आहे. याशिवाय, नवरात्रीत महत्त्वाचा मानला जाणार गरबा (मातीचं सजवलेलं मडकं) देखील महागला आहे. एक गरबा 200 ते 350 रुपयांना विकला जात आहे अशी माहिती टोपली विक्रेत्यांकडून मिळत आहे.