Sunday, August 31, 2025 06:01:43 AM

गेल्या वर्षाच्या अनुभवातून धडा; यंदा रामनवमीसाठी मालवणीत कडक सुरक्षा

रामनवमीचा पवित्र सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच, मुंबईच्या मालवणी परिसरात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.

गेल्या वर्षाच्या अनुभवातून धडा यंदा रामनवमीसाठी मालवणीत कडक सुरक्षा

मुंबई: रामनवमीचा पवित्र सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच, मुंबईच्या मालवणी परिसरात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी, याच शोभायात्रेदरम्यान दगडफेकीच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे यंदा पोलीस प्रशासन अत्यंत सतर्क असून संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ड्रोनच्या सहाय्याने पोलीस यंत्रणेची शोभायात्रेच्या मार्गावर नजर:

या शोभायात्रेच्या मार्गावर पोलीस यंत्रणेकडून ड्रोनच्या सहाय्याने देखील नजर ठेवण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे आणि पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक टप्प्यावर पोलिसांची उपस्थिती असून, चोख नजर ठेवली जात आहे.

ढोलताशांच्या गजरात उत्सव साजरा:

मालवणी परिसरात होणाऱ्या या शोभायात्रेमध्ये आकर्षक रथ, ढोलताशांच्या गजरात उत्सव साजरा करणारे नागरिक, महिलांचे लेझीम पथक आणि मुलांचे विविध वेशभूषा सादर करणारे संच सहभागी झाले आहेत. सर्व धर्मीय नागरिकांनी या शोभायात्रेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सामाजिक सलोखा अधिक बळकट झाल्याचं चित्र दिसून येत आहे.

पोलीस प्रशासनाने घेतलेली दक्षता कौतुकास्पद:

कायद्याची अंमलबजावणी आणि शांततेत सण पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेली दक्षता कौतुकास्पद ठरत आहे. मालवणीतील रामनवमी उत्सव यंदा शिस्तबद्ध, उत्साही आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडत असल्याचं चित्र संपूर्ण शहरात उमटलं आहे.


सम्बन्धित सामग्री