Sunday, August 31, 2025 11:56:01 PM

वसई शिरसाडमध्ये 506 कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी; समाजात समाधानाची लहर

पालघर जिल्ह्यात 506 कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी; नरेंद्राचार्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शिरसाडमध्ये ऐतिहासिक सोहळा, सनातन धर्मात पुन्हा प्रवेश.

वसई शिरसाडमध्ये 506 कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी समाजात समाधानाची लहर

वसई : पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यातील शिरसाड येथे हिंदू धर्मात पुन्हा परतलेल्या कुटुंबांचा एक भव्य व ऐतिहासिक सोहळा पार पडला. या घरवापसी महाअभियानात तब्बल 506 कुटुंबांनी विधिवत हिंदू धर्मात पुनःप्रवेश केला. हा सोहळा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. आतापर्यंत एकूण 1,51,278 कुटुंबांना त्यांच्या मूळ धर्मात परत आणण्याचे कार्य या अभियानांतर्गत करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत देशात विविध ठिकाणी आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दबावाखाली अनेक हिंदू कुटुंबांचे धर्मांतर घडवून आणले गेले. गरिबी, अज्ञान, मदतीच्या आमिषाने अनेकांना त्यांच्या मूळ धर्मापासून दूर केलं गेलं. पण काळाच्या ओघात आणि अनुभवातून शिकून ही मंडळी पुन्हा आपल्या सनातन धर्माच्या पायाशी नतमस्तक झाली आहेत. धर्मांतरानंतरही आत्मिक समाधान न मिळाल्याने, समाजात आपलेपणाची भावना न लाभल्याने आणि धार्मिक कृत्यांत परकेपण वाटल्याने अनेकांनी पुन्हा हिंदू धर्मात परत येण्याचा निर्णय घेतला आहे.घरवापसी करणाऱ्या या कुटुंबांनी भावना व्यक्त केली कि , त्यांनी चुकीच्या मार्गावर जाऊन धर्मांतर केले होते, पण आता त्यांना आपली चूक लक्षात आली आहे आणि आत्म्याची शांतता, सांस्कृतिक ओळख आणि परंपरांचे रक्षण हे सर्व फक्त हिंदू धर्मातच शक्य असल्याचे त्यांनी अनुभवलं आहे.

 


18 एप्रिल रोजी शिरसाड, वसई येथे झालेल्या या कार्यक्रमात पालघर, नाशिक तसेच गुजरातमधून आलेल्या धर्मांतरित कुटुंबांनी विधिवत पूजा, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून आपला सनातन धर्म स्वीकारला. त्यांना भगवद्गीता, गंगाजल, तुळशीचे रोप आणि धर्मग्रंथ देऊन सन्मानपूर्वक पुन्हा धर्मात सामील करण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार डॉ. हेमंत सावरा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रमेश ओझे यांच्यासह अनेक धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. धर्म म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे, ती आपली संस्कृती, आपले अस्तित्व आणि आपले मूळ आहे. ज्यांची घरवापसी झाली आहे, त्यांनी फक्त धर्म नव्हे तर आपली ओळख पुन्हा प्राप्त केली आहे, असे त्यांनी सांगितले 

या कार्यक्रमाने हिंदू समाजात नवचैतन्य निर्माण केलं असून, सर्व स्तरांतून या सोहळ्याचं कौतुक होत आहे. धर्म हे केवळ परंपरा नसून, एक विचार, एक जीवनपद्धती आहे . ही भावना या कार्यक्रमातून अधोरेखित झाली आहे. आज ज्या पद्धतीने हजारो लोकांनी आपल्या धर्मात परत येण्याचा निर्णय घेतला आहे, तो निश्चितच समाजप्रबोधन आणिजाणीवेचा विजय आहे


सम्बन्धित सामग्री