मुंबई: मुंबईत गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले आहे. वडाळ्यात सर्वाधिक 161.4 मिमी पाऊस झाला. मात्र, मुंबईच्या धरणांमध्ये पाणीसाठा फक्त 8.60% आहे. अंधेरी पश्चिममध्ये 19 जून रोजी 11 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस पाहायला मिळाला. आज मुंबईतील पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत 24 तासांच्या कालावधीत अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पालिकेच्या स्वयंचलित केंद्रांवर झालेल्या नोंदीनुसार मुंबईतील वडाळ्यात सर्वाधिक 161.4 मिमी पावसाची नोंद झाली. रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. सध्या मुंबईत ढगाळ वातावरण आहे. मात्र मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणक्षेत्रात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
सध्याचा धरणातील पाणीसाठा खालीलप्रमाणे आहेत:
उर्ध्व वैतरणा: 0.91 टक्के
मोडक सागर: 26.05 टक्के
तानसा: 9.39 टक्के
मध्य वैतरणा: 10.67 टक्के
भातसा: 6.00 टक्के
विहार: 33.30 टक्के
तुळशी: 28.62 टक्के
एकूण: 8.60 टक्के