मुंबई: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ऐतिहासिक घोषणा आज झाली. अर्थमंत्री अजित पवार यांनी 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी ही माहिती दिली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. “भावफुलांना पायी उधळून, आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन…” या शब्दांत अजित पवार यांनी मायमराठीचा गौरव करत पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा केला जाईल. या आठवड्यात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे उच्चस्तरीय संशोधन केंद्र आणि अनुवाद अकादमी स्थापन केली जाईल.त्याचबरोबर, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे मराठी भाषेचा जागतिक स्तरावर सन्मान वाढेल आणि तिच्या अभ्यास व संशोधनाला नवा वेग मिळेल.