Weather Update: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः 6 जुलैपासून कोकण, घाटमाथा आणि पुणे विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलैपासून कोकण, घाटमाथा, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या भागांत पाऊस तीव्र होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा: भारतातील ॲपलच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; भारत-चीन वादाचा iPhone निर्मितीला फटका?
पुणे शहरात बुधवारी रात्री जोरदार पाऊस पडला असून, घाटमाथ्यावरही पावसाची हजेरी लागली आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा या भागांतील नागरिकांनी पुढील काही दिवसांत सावधगिरी बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे, मराठवाडा आणि विदर्भ भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. मात्र हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 6 जुलैपासून या भागांतही पाऊस सक्रीय होईल. यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. विदर्भात गुरुवारी हलक्यापासून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, अकोला, नागपूर, चंद्रपूरसह काही जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहील.
राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची हजेरी लागल्याने तापमानात घसरण झाली आहे. हवामानातील बदलामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोटचा वापर करावा, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. पावसाच्या या सत्रामुळे शेतीला चालना मिळण्याची शक्यता असून, खरिपाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.