Wednesday, September 03, 2025 09:05:38 AM

कारचे टायर फुटल्यामुळे मोठा अपघात; दोघे जण जागीच ठार तर चौघेजण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर ते लातूर या मार्गावर जाणाऱ्या कारचा टायर फुटल्यामुळे कार उलटली. या अपघातात दोन वर्षांच्या चिमुकल्यासह त्याची आई जागीच ठार झाली, तर चौघेजण गंभीर जखमी झाले.

कारचे टायर फुटल्यामुळे मोठा अपघात दोघे जण जागीच ठार तर चौघेजण गंभीर जखमी

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर ते लातूर या मार्गावर जाणाऱ्या कारचा टायर फुटल्यामुळे कार उलटली. या अपघातात दोन वर्षांच्या चिमुकल्यासह त्याची आई जागीच ठार झाली, तर चौघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगाव (ता. अंबड) फाट्याजवळ घडली.

नेमकं प्रकरण काय?

लातूर येथील अमरदीप बाबूराव चव्हाण (वय: 40) आणि रोहिणी अमरदीप चव्हाण (वय: 30) हे दांपत्य नोकरीसाठी अमेरिकेत होते. भारत-पाकिस्तान युद्धामुळे काही दिवसांची सुट्टी घेऊन ते भारतात परतले होते. छत्रपती संभाजीनगर येथे प्रदीप चव्हाण यांच्या घरी 5-6 दिवस मुक्काम करून, कुटुंबासह कारने (एमएच 20 सीएस 4422) नातेवाइकांना भेटण्यासाठी गावी जात होते.

दोन दिवस लातूरला मुक्काम करून ते बुधवारी अमेरिकेला जाणार होते. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. लातूरकडे भरधाव वेगाने जात असताना सौंदलगाव फाट्याजवळ त्यांच्या कारचा टायर फुटला आणि कार रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातात रोहिणी अमरदीप चव्हाण (वय: 30) आणि नुरवी अमरदीप चव्हाण (वय: 2) या मायलेकी जागीच ठार झाल्या. अमरदीप बाबूराव चव्हाण (वय: 40), विश्रांती प्रदीप चव्हाण (वय: 29), रुद्रांश प्रदीप चव्हाण (वय: 2) आणि आणखी एकजण असे एकूण चार जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतरची मदत:

अपघात इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली. सौंदलगाव, वडीगोद्री आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारचे दरवाजे तोडून सर्वांना बाहेर काढले आणि पाचोड (ता. पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी रोहिणी अमरदीप चव्हाण (वय: 30) आणि नुरवी अमरदीप चव्हाण (वय: 2) या मायलेकींना मृत घोषित केले. अमरदीप बाबूराव चव्हाण (वय: 40), विश्रांती प्रदीप चव्हाण (वय: 29), रुद्रांश प्रदीप चव्हाण (वय: 2) यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला होता. या घटनेची नोंद गोंदी पोलिस चौकीत करण्यात आली असून, गोंदी पोलिस पुढील तपास करीत आहेत.


सम्बन्धित सामग्री