मुंबई: मुंबईच्या मेट्रो प्रकल्पातील 'सिद्धिविनायक मेट्रो स्थानक' या नावावरून मोठा वाद पेटला आहे. कारण या स्थानकाचे नामकरण थेट इंग्रजीत करण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) संताप व्यक्त केला आहे.
मनसेने मेट्रो प्रशासनाला थेट इशारा देत म्हटलं आहे, 'मराठीमध्ये नाव द्या, नाहीतर काचा फोडू!' अशा स्पष्ट आणि आक्रमक शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
मुंबईमध्ये मेट्रोचं काम गेल्या अनेक वर्षांपासून वेगाने सुरू आहे. मेट्रो ३ मार्गाचे काम आता पूर्णत्वास गेलं असून स्थानकांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर 'सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन' हे नाव इंग्रजीत दिसताच मनसेने याला कडाडून विरोध केला आहे.

मनसेचा स्पष्ट संदेश
'मुंबईत मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. स्थानकांची नावे असतील, फलक असतील, की जाहिराती – सर्वत्र मराठीचा प्राधान्याने वापर झाला पाहिजे,' असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितलं.
शेवटी प्रश्न हाच:
'मराठीसाठी उठलेली ही लाट यशस्वी होणार का?' 'मेट्रो प्रशासन मनसेच्या इशाऱ्याची दखल घेणार का?' 'आता स्थानकं मराठीत होणार की आंदोलन उग्र रूप घेणार?' या सगळ्या प्रश्नांवर नेमका काय तोडगा निघतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मनसे फक्त आंदोलनापुरती मर्यादित न राहता, त्यांनी अमराठी नागरिकांसाठी खास मराठी शिकवण्यासाठीचे अभियानही सुरू केले आहे. याअंतर्गत अमराठी व्यावसायिकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी खास 'मराठी शाळा' सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये बिगर मराठी लोकांना मराठी भाषा शिकवली जाईल, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.