मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या एका विडंबनात्मक गाण्याच्या माध्यमातून गद्दार आणि दाढीवाला म्हणत जोरदार टोले लगावले होते. त्याच्या या टीकेनंतर राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चौकशीसाठी पोलीस कामराच्या घरी पोहोचले असताना, घरच्यांनी तो घरी नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस लगेचच परतले असले तरी त्याचा शोध अद्याप सुरू आहे.
कुणाल कामरा याला यापूर्वी दोन वेळा समन्स पाठवले गेले होते. मात्र, त्याने अद्याप चौकशीसाठी पोलिसांसमोर हजेरी लावलेली नाही. त्यामुळे आज खार पोलीस ठाण्यात त्याची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र, तो गैरहजर राहिल्याने पोलिसांचे एक पथक त्याच्या माहिम येथील निवासस्थानी दाखल झाले. पोलिसांकडून जर तो लवकर हजर झाला नाही, तर तिसऱ्या समन्ससह पुढील कारवाई करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: व्हायरल गर्ल मोनालिसाचा दिग्दर्शक अटकेत! सनोज मिश्रावर बलात्काराचा गंभीर आरोप
शिंदे गटाच्या शिवसेनेने कामराच्या या विडंबनावर नाराजी व्यक्त करत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २३ मार्च रोजी झालेल्या एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये त्याने वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवसेनेचे नेते मुरजी पटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा व्हिडिओ एका कार्यकर्त्याने त्यांना पाठवला होता, ज्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. दुसऱ्या समन्सची मुदत संपूनही कामरा चौकशीसाठी न आल्याने त्याच्यावर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.