Wednesday, September 03, 2025 12:02:50 PM

Afghanistan Earthquake Update: अफगाणिस्तानमधील भूकंपात 1400 हून अधिक जणांचा मृत्यू; 3000 पेक्षा जास्त जखमी

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पुष्टी केली आहे की पूर्वेकडील भागात रविवारी रात्री झालेल्या भूकंपात मृतांचा आकडा 1400 च्या पुढे गेला आहे, तर 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

afghanistan earthquake update अफगाणिस्तानमधील भूकंपात 1400 हून अधिक जणांचा मृत्यू 3000 पेक्षा जास्त जखमी

Afghanistan Earthquake Update: अफगाणिस्तानातील भूकंपासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पुष्टी केली आहे की पूर्वेकडील भागात रविवारी रात्री झालेल्या भूकंपात मृतांचा आकडा 1400 च्या पुढे गेला आहे, तर 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सरकारी प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की ही संख्या केवळ कुनार प्रांतापुरतीच आहे. प्राप्त माहितीनुसार, 6.0 तीव्रतेचा भूकंप पाकिस्तानच्या सीमेजवळील जलालाबादजवळ, मध्यरात्रीपूर्वी झाला. या भूकंपाचे केंद्रबिंदू केवळ 8 किमी खोलीवर असल्याने जोरदार हादरे बसले. त्यामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली. माती व लाकडापासून बांधलेल्या घरांच्या भिंती कोसळून लोक ढिगाऱ्याखाली अडकले. कठीण भूभागामुळे बचावकार्य अडथळले येत असून, हेलिकॉप्टर उतरू न शकल्याने कमांडोंना एअरड्रॉप करून जखमींना बाहेर काढावे लागले.

हेही वाचा - Quetta Rally Blast in Pakistan: पाकिस्तानातील क्वेटा हादरले! राजकीय रॅलीत भीषण स्फोट; 14 जणांचा मृत्यू, 35 जण जखमी

भूकंप इतका प्राणघातक का ठरला?

अफगाणिस्तानात बहुतेक घरे मातीच्या विटा, दगड व लाकूड यासारख्या साहित्याने बांधली जातात. अभियांत्रिकी डिझाइन किंवा बांधकाम नियमांचा अभाव असल्याने अशी घरे भूकंप सहन करू शकत नाहीत. हादऱ्यांदरम्यान घरांच्या छप्पराखाली लोक चिरडले जातात. तथापी, भूकंप मध्यरात्री झाल्याने बहुतेक लोक झोपेत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले. हा प्रदेश हिमालय–हिंदूकुश पर्वतरांगेत असल्याने टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करमुळे येथे सतत भूकंप होत असतात. 2022 आणि 2023 मधील भूकंपांमध्येही 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - Khawaja Asif Comment On Floodwater: 'पुराचे पाणी बादलीत भरा, ते अल्लाहचे वरदान आहे'; पाकिस्तानचे संरक्षणमंत्र्याचे वादग्रस्त विधान

दरम्यान, 2021 मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून अफगाणिस्तानावर संकटांचे सावट गडद झाले आहे. तिसऱ्या मोठ्या भूकंपाने हाहाकार माजवला असतानाच देशाला मदत निधीतील कपात, कमकुवत अर्थव्यवस्था आणि इराण व पाकिस्तानमधून लाखो निर्वासितांची जबरदस्ती परतफेड या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय लक्ष युक्रेन आणि इतर संकटांकडे वळल्याने अफगाणिस्तानकडे मदतीसाठी पाहणारे हात कमी झाले आहेत. देणगीदार देशांचे बजेट कमी झाल्याने अफगाणिस्तानमध्ये आरोग्य व्यवस्थेची मोठी पडझड झाली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री