भोर: भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथे जाणारा रस्ता म्हणजे नागरिकांसाठी गेल्या कित्येक वर्षांचा एक खोल जखम बनला होता. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने स्थानिक नागरिक, भाविक आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात होती. मात्र, शासनदरबारी या मागणीला अद्याप प्रतिसाद मिळत नव्हता.
सुप्रिया सुळे यांनी अखेर आंदोलनाची वाट धरली:
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अखेर आंदोलनाची वाट धरली. त्यांनी बुधवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडत, शासनाच्या दुर्लक्षावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 'जनतेच्या प्रश्नांबाबत शासनाने दुर्लक्ष केलं, तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही', असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलून दाखवला.
सुळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाला जाग आली आणि तातडीने हालचाल सुरू झाली. जिल्हा प्रशासनाने संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लवकरच काम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन सुळे यांना दिले. त्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
ही लढाई रस्त्याची नव्हे, तर मतदारांच्या हक्कासाठी होती:
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुळे म्हणाल्या, 'ही लढाई रस्त्याची नव्हे, तर मतदारांच्या हक्कासाठी होती. सरकारकडून लेखी आश्वासन मिळालं, हे आमचं यश नाही, तर मतदारांचा विजय आहे. मतदारांना न्याय मिळाला, हेच महत्त्वाचं'.
आंदोलनात अनेकजण सहभागी:
या आंदोलनामध्ये अनेक स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि युवक सहभागी झाले होते. त्यांच्या पाठिंब्यामुळे आंदोलन अधिक प्रभावी बनले. श्री क्षेत्र बनेश्वर हे एक धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थान आहे. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात. मात्र रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे प्रवास कठीण बनला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. यामुळे प्रशासनालाही नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागला. या आंदोलनाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, लोकशाहीमध्ये संघर्ष केल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. आणि एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या अडचणीसाठी रस्त्यावर उतरतो, तेव्हा त्याचे पडसाद दिल्लीपर्यंत जातात. सुप्रिया सुळे यांच्या या भूमिकेचं अनेक स्तरातून कौतुक होत आहे.