मुंबई: मुंबईतील काळबादेवी येथे असलेली 120 वर्षांहून अधिक जुनी असलेली स्वदेशी मार्केट इमारत धोकादायक स्थितीत असून त्याच्या पुनर्विकासासाठी काही व्यापारी विरोध करत आहेत. त्यामुळे 500 हून अधिक भाडेकरू व्यापारी आणि काही रहिवासी आहेत. यात अनेक गुजराती आणि काही मराठी रहिवासी आहेत. म्हाडा व बीएमसी दोघांनीही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले असून धोकादायक भाग पाडण्यास सुरुवातही केली आहे. परंतु 12 व्यापाऱ्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांच्याही जीवाचा धोका पत्करत पुर्नविकासाच्या विरोधात जाऊन बीएमसीच्या नोटीसवर स्थगिती आणली.
इमारत धोकादायक असूनही तिथे अजूनही व्यापार सुरू आहे. या विरोधात शुक्रवारी स्वदेशी मार्केटमधल्या पुर्नविकासाच्या बाजूने असलेल्या व्यापारी आणि रहिवाश्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन पुनर्विकास प्रक्रियेस चालना देण्यासाठी असून प्रशासन, विरोधक दुकानदार आणि व्यवस्थापन यांच्यात संवादातून तोडगा निघण्याची अपेक्षा इथल्या दुकानदारांनी व्यक्त केली.
हेही वाचा: मुंबईत तांदूळ तस्करी व अपहाराचा आरोप; अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी
गेली 48 वर्ष मुकेश मोरे स्वदेशी मार्केटच्या इमारतीत वास्तव करत आहेत. इमारत धोकादायक असल्यामुळे बीएमसीने इमारतीचा पाचवा मजला तोडला असून तरीही काही व्यापाऱ्यांना फक्त व्यापाराची चिंता असल्याने ते पुर्नविकासाला विरोध करत असल्याचं ते सांगतात. लोकांच्या जीवाशी खेळू नका अशी विनंती ते करतात.
रुपम भाटीया हे स्वदेशी मार्केटमधले छोटे व्यापारी आहेत. म्हाडाने रहिवाश्यांची घरं तोडली तेव्हा एकही व्यापारी बघायला आला नाही असं ते सांगतात. काही भाग अर्धवट तोडल्यानंतरही पुर्नविकासाला विरोध करण्याचं काय कारण आहे? काही निवडक व्यापाऱ्यांच्या हट्टापायी अनेकांच्या जीवाशी खेळ करू नका असं ते सांगतात. ग्राहक आणि रहिवाश्यांच्या जीव धोक्यात न घालण्यासाठी मराठी रहिवासी आणि गुजराती व्यापारी एकत्र आले आहेत.