जळगाव: पाचोरा येथील एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सुपडू भादू पाटील विद्या मंदिर येथील आहे. मधल्या सुट्टीत जेव्हा विद्यार्थी प्रांगणावर डबा खात होते, तेव्हा शाळेतील एका वर्गात शिक्षकाने गळफास घेतल्याचे उघड झाले. रवींद्र महाले असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिक्षकाचा मृतदेह ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, शिक्षक रवींद्र महाले यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हेही वाचा: जीव वाचवण्यासाठी पठ्ठ्या भिडला थेट बिबट्याशी; घटनेचा व्हिडीओ समोर
नेमकं प्रकरण काय?
माहितीनुसार, शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान जेव्हा विद्यार्थी प्रांगणात खेळत होते, तेव्हा शिक्षक रवींद्र महाले यांनी दुसऱ्या मजल्यावरील वर्ग खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. जेव्हा मधली सुट्टी संपली, तेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेत रवींद्र महाले वर्गात आढळले. ऐन शाळा सुरू असताना ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर, शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. मानसिक तणावातून शिक्षकाने टोकाची भूमिका घेतल्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी सखोल तपास केला जात आहे.