नागपूर: विदर्भात उन्हाचा चटका दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने नवे उच्चांक गाठले असून नागरिकांची अवस्था अंथरुणावर चटके सहन करणाऱ्यांसारखी झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत अकोला, नागपूर, यवतमाळ, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांत उष्णतेची जोरदार लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अहवालानुसार, यंदा देशभर सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होणार आहे. विदर्भात सध्या सरासरीच्या चार अंशांनी अधिक तापमान आहे, ज्यामुळे उन्हाचा तीव्र फटका बसत आहे. नागपूर वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तापमानातील वाढीमागील एक कारण म्हणजे गुजरात आणि राजस्थानकडून वाहणारे कोरडे वारे. यामुळे तापमान झपाट्याने वाढते आहे. नागपूरमध्ये काल 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर अकोल्यात ते 44.2 अंशांपर्यंत गेले. हवामान खात्याचे अधिकारी बी. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, राज्यातील तापमानाचे प्रमाण या उष्ण वाऱ्यांमुळे अधिक वाढले आहे आणि याचा परिणाम पुढील काही दिवस अधिक तीव्रतेने जाणवू शकतो.
नागपूर महानगरपालिकेने यासाठी 'हिट अॅक्शन प्लॅन' लागू केला आहे. या अंतर्गत बेघर नागरिकांसाठी शेल्टर हाऊसेस उभारण्यात आली असून शहरातील गार्डन दुपारच्या वेळेस उघडे ठेवण्यात येणार आहेत. 10 शासकीय रुग्णालयांत विशेष वॉर्ड तयार करण्यात आले असून उष्माघात झालेल्यांसाठी विशेष औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये जनजागृती मोहीम राबवून उन्हापासून बचाव करण्याच्या उपाययोजना नागरिकांना समजावून सांगण्यात येणार आहेत.