परभणी: परभणीमध्ये पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परभणी जिल्ह्यात तणाव निर्माण झाला असून आंबेडकरी समाजामध्ये तीव्र संताप आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे घाटी रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाची गर्दी झाली आहे. मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
रुग्णालयाबाहेर घोषणाबाजी करत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. शिव विच्छेदन गृहाबाहेरही समाज मोठ्या संख्येने उपस्थित असून निषेधाचे सूर उमटत आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पोलिसांच्या मारहाणीत निष्पाप तरुणाचा बळी गेल्याचा आरोप सोमनाथच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे आंबेडकरी समाजाचा रोष वाढत असून न्यायाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे आंबेडकरी समाजाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजाकडून करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत या आंदोलनाचा परिणाम महाराष्ट्रातील परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.