जुगल पाटील. प्रतिनिधी. जळगाव: मुंबई उच्च न्यायालयाने 11 जुलै 2006 रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात सोमवारी महत्त्वाचा निकाल दिला. या प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. यात जळगावचे आसिफ खान यांचा देखील समावेश आहे. या दरम्यान, असिफ खान यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले की, 'सरकारच्या दबावामुळे यंत्रणांनी आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवले होते'. अगदी बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या अधिकारी आम्हाला म्हणायचे की, 'तुम्ही निर्दोष आहात. तुम्ही सुटून जाल. परंतु आमच्यावर प्रचंड दबाव आहे'. पुढे, त्यांनी धक्कादायक दावा केला की, 'या दबावापोटीच तपासाधिकारी विनोद भट यांनी स्वत:चे जीवन संपवले'.
हेही वाचा: Chhtrapati Sambhajinagar: महिलेची हात जोडून विनंती; सोनोग्राफीचा डॉक्टर मात्र गाढ झोपेत
काय म्हणाले आसिफ खान?
'इतकच नाही, जर यंत्रणांनी योग्य पद्धतीने मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास केला असता आणि त्यातील खऱ्या दोषींना जर पकडले असते तर कदाचित देशातील पुढील बॉम्बस्फोट हे टाळता आले असते. तसेच, निर्दोष सुटण्याच्या आनंदापेक्षा बॉम्बस्फोटातील मयत आणि जखमींना न्याय मिळू शकला नाही. याचे दुःख जास्त आहे. आम्ही देखील एक प्रकारे बॉम्बस्फोटाचे पीडित आहोत. कारण या खटल्यात, आमच्या आयुष्याची 19 वर्षे उद्ध्वस्त झाले', असे देखील आसिफ खान म्हणाले.
कोण आहेत आसिफ खान?
आसिफ खान हे मूळचे जळगावचे असून ते सिव्हील इंजिनियर आहेत. जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाला होता, तेव्हा ते ड्युटीवर होते. त्यांचे हजेरी पत्रक आणि लोकेशन चार्जशीटमध्येही होते. तरीदेखील, त्यांना अटक करण्यात आली. या 19 वर्षांच्या कालावधीत त्यांच्या आयुष्याचे तसेच, कुटुंबीयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड यातना भोगावे लागले. आता पुढील आयुष्य कसे जगायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.