नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अशातच, शनिवारी दुपारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान युद्धात मध्यस्ती करून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाल्याची माहिती एक्सवरून दिली. मात्र, शनिवारी रात्री जम्मू काश्मीर येथील श्रीनगरमध्ये पाकिस्तानने पुन्हा आक्रमण करण्यास सुरूवात केली, अशी माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सद्वारे दिली.
अशातच, रविवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर चर्चा केली. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित डोवाल म्हणाले की, 'भारतासाठी युद्ध हा पर्याय नाही. दहशतवादविरोधी कारवाई करण्याची गरज आहे', असे त्यांनी सांगितले.
अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतची चर्चा:
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 'अजित डोवाल यांनी संवादादरम्यान सांगितले की पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे, भारताने दहशतवादविरोधी कारवाई करण्याची गरज आहे. युद्ध हा भारताचा पर्याय नाही आणि तो पर्याय कोणत्याही पक्षाच्या हिताचा नाही. भारत युद्धबंदीसाठी वचनबद्ध आहे आणि शक्य तितक्या लवकर प्रादेशिक शांतता प्रस्थापित करण्याची आशा आहे', असे अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान म्हटले आहे.
काय म्हणाले चीनचे परराष्ट्र मंत्री?
अजित डोवाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर चीनचे परराष्ट्रमंत्री म्हणाले की, 'भारत आणि पाकिस्तानला व्यापक आणि कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी चीन समर्थन करतो. हे भारत आणि पाकिस्तान दोघांच्याही हिताचे आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चीन निषेध करतो आणि त्यासोबतच, आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती एकमेकांशी जोडलेली आहे. आपण आशियाई प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखले पाहिजे', असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे.
'भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश असून हे दोन्ही देश चीनचे शेजारी आहेत. 'युद्ध हा भारताचा पर्याय नाही' या तुमच्या विधानाचे आम्ही कौतुक करतो. भारत आणि पाकिस्तान शांतता आणि संयम राखतील अशी प्रामाणिक आशा करतो. संवाद आणि सल्लामसलतीद्वारे मतभेद योग्यरित्या हाताळले जाऊ शकतात. चर्चेतून, भारत आणि पाकिस्तान कायमस्वरूपी वाद मिटवतील अशी आम्ही आशा करतो. भारत आणि पाकिस्तानच्या हितासाठी तसेच, आंतरराष्ट्रीय समुदायाची देखील हीच इच्छा आहे', असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे.