मुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन होणार आहे. गुरूवारी 5 डिसेंबर रोजी राज्यात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीसांना सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला आहे. यावेळी राजभवनावर एकनाथ शिंदे आणि अजित पवारदेखील उपस्थित होते. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात दीड तास चर्चा झाली. या चर्चेत शिंदेंनी मंत्रिमंडळात राहावे अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे. एकूणच काय तर भाजपाकडून एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्लीत गृहमंत्री शाहांसोबत झालेल्या बैठकीनंतर शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. स्वत: भाजपालाही शिंदे नाराज असल्याचे जाणवत असल्याकारणाने भाजपाकडून शिंदेंची मनवणी केली जात आहे.
काय झालं दिल्लीतील बैठकीत ?
महायुतीची गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत बहुमत असल्याने भाजपाकडे मुख्यमंत्रीपद असेल आणि गृहखात असेल असे सांगण्यात आले. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांकडे उपमुख्यमंत्रीपद असेल असे जाहीर करण्यात आले. या बैठकीनंतर शिंदे मुंबईत न थांबता साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी गेले. त्यानंतर शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात शिवसेना नेत्यांकडून गृहखात्याची मागणी करण्यात आली. आता एकनाथ शिंदेंनी देखील गृहखात्यावर दावा करण्यात आला आहे.