Asia Cup India vs Pakistan: आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर झालेल्या विजयाला भारतीय संघाने वेगळा अर्थ दिला आहे. दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर सात विकेट्सने मिळालेला दणदणीत विजय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी भारतीय सशस्त्र दलांना आणि जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना समर्पित केला. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाले, 'ही आमच्यासाठी उत्तम संधी आहे. आम्ही पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत उभे आहोत आणि त्यांना आमची एकता व्यक्त करतो. आजचा विजय आम्ही आमच्या सशस्त्र दलांना समर्पित करतो ज्यांनी नेहमीच शौर्य दाखवले आहे. ते आम्हाला प्रेरणा देत राहतील.'
हेही वाचा - IND vs PAK Asia Cup 2025 Toss: पाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय; जाणून घ्या दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
दरम्यान, रविवारी खेळण्यात आलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानने दिलेले 128 धावांचे लक्ष्य अवघ्या 25 चेंडू शिल्लक ठेवून गाठले. प्रेक्षकांनी बहिष्काराच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत स्टेडियममध्ये गर्दी केली होती. हा सामना पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. विरोधी पक्षांनी बीसीसीआय आणि सरकारवर सामना न रद्द केल्याबद्दल तीव्र टीका केली होती.
हेही वाचा - World Boxing Championship: कौतुकास्पद! वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मीनाक्षी हुड्डाने पटकावले सुवर्णपदक!
तथापी, भारतीय खेळाडूंनी यावेळी दहशतवादाविरुद्ध कठोर संदेश दिला. त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतरही हस्तांदोलन केले नाही. यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन म्हणाले, 'आम्हाला हस्तांदोलन करायचे होते, पण विरोधी संघाने तसे न केल्यामुळे निराशा वाटली.'