नवी दिल्ली: इटालियन लक्झरी ब्रँड प्राडाने मिलान फॅशन वीक 2025 मध्ये त्यांच्या मेन्सवेअर स्प्रिंग/समर कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पल सादर केली. मात्र, कोल्हापूर किंवा भारताचा उल्लेख न केल्याने नेटिझन्सने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. कोल्हापुरातील कारागिरांनी या आलिशान चपलांबाबत शंका उपस्थित केली असून, जीआय मानांकन असूनही 'प्राडा' या आंतरराष्ट्रीय कंपनीने हुबेहूब कोल्हापुरी चप्पल जागतिक व्यासपीठावर कशी झळकवली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
अशातच, कोल्हापुरी चप्पलबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्या खाजगी कंपनीने कोल्हापुरी चप्पल जगासमोर आणली, त्याच कंपनीने कोल्हापुरी चपलेची किंमत 1 लाख 23 हजार रुपये ठेवली आहे. इतक्या मोठ्या कंपनीने अशी मोठी चूक केल्याने कोल्हापूरकरांसह देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.
कोल्हापुरी चप्पलवर एका नेटिझनची संतप्त प्रतिक्रिया:
'प्राडा कोल्हापुरी चप्पल 1.2 लाखांना विकत आहे. महाराष्ट्राच्या वारशाचं प्रतीक असलेल्या हस्तनिर्मित चप्पल कोल्हापूरच्या बाजारपेठेत 300 ते 1500 रुपयांत विकल्या जातात. अशातच, प्राडा त्यावर स्वतःचा लोगो लावत, त्यांना ''लेदर सँडल'' म्हणते आणि कोल्हापुरी चपलेचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करते. ही लक्झरी नसून चोरी आहे', अशी संतप्त प्रतिक्रिया एका नेटिझनने दिली.
'ही डिझाईन भारतातील चमार समुदायाकडून चोरण्यात आली आहे. ते पिढ्यान् पिढ्या या चप्पल हाताने विणून तयार करीत आहेत. त्यांना कोणतेही श्रेय दिलं गेलं नाही. ही लक्झरी ब्रँडिंगने केलेली चोरी आहे', अशी संतप्त प्रतिक्रिया दुसऱ्या नेटिझनने दिली.