Jaya Bachchan: महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि भावनांचा उत्सव मानला जातो. मुंबईतील लालबागचा राजा आणि सिद्धिविनायक जितके प्रसिद्ध आहेत, तितकेच पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीही भक्तांच्या मनात वेगळं स्थान राखून आहेत. या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. अनेक सेलिब्रिटी देखील इथे दर्शन घेण्यासाठी येतात आणि नवस फेडतात. त्यात एक अनोखी कहाणी जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलेली आहे.
1982 साली घडलेली एक घटना आजही लोकांच्या आठवणीत ताजी आहे. अमिताभ बच्चन ‘कुली’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाले होते. शूटिंगमध्ये मारामारीचा सीन चित्रीत करताना ते स्टीलच्या टेबलावर आपटले आणि त्यांच्या प्रकृतीत अचानक गंभीर बिघाड झाला. काही काळ तर त्यांना वाचवणं कठीण आहे, अशा बातम्याही पसरल्या. जवळपास 72 तास डॉक्टरांनी त्यांना ऑपरेट करू शकले नाहीत. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ ते रुग्णालयात दाखल होते. देशभरातील चाहत्यांनी त्यांच्या जीवासाठी देवाकडे हात जोडले.
हेही वाचा: Pune Ganpati Visarjan Miravnuk 2025 : ढोलताशाच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरूवात; पालखीत बाप्पा विराजमान
याच काळात त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी बाप्पाला नवस केला होता. त्यांनी मनोमन प्रार्थना केली की अमिताभ यांचा जीव वाचला तर त्या दगडूशेठ गणपतीला सोन्याचे कान अर्पण करतील. भक्ती, श्रद्धा आणि नात्यांमधील प्रेमाचा हा एक अनोखा संगम होता.डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी आणि संपूर्ण देशभरातून झालेल्या प्रार्थनांमुळे अमिताभ बच्चन बरे झाले. जेव्हा ते घरी परतले तेव्हा चाहत्यांनी दिवाळीसारखा उत्सव साजरा केला. मुंबईच्या रस्त्यांवर लोकांनी त्यांचे स्वागत केले. अमिताभ स्वतः आजही तो प्रसंग दुसरा जन्म मानतात.
यानंतर जया बच्चन यांनी आपला नवस पूर्ण करण्यासाठी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात हजेरी लावली. त्यांनी सोन्याचे कान अर्पण करून बाप्पाचे आभार मानले. त्या वेळी अमिताभ बच्चनही त्यांच्या सोबत होते. भक्तांमध्ये ही घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरली.
हेही वाचा: Pune Ganpati Visarjan 2025: गणेश विसर्जनावेळी पुण्यातील मुख्य रस्ते बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या
आज अनेकांना ठाऊक नाही की या सोन्याच्या कानांमागे अशी हृदयस्पर्शी गोष्ट दडलेली आहे. जया बच्चन यांच्या या कृतीमुळे श्रद्धा किती खोलवर रुजलेली असते आणि संकटाच्या काळात देवावर ठेवलेला विश्वास कसा आधार देतो, याचे उदाहरण मिळते.
‘कुली’ चित्रपटाच्या शेवटी या अपघाताशी निगडीत एक खास सीन दाखवण्यात आला होता. अमिताभ बच्चन अनेकदा सांगतात की, चाहत्यांच्या प्रार्थना, जया बच्चन यांचा नवस आणि स्वतःची इच्छाशक्ती यामुळेच ते पुन्हा उभे राहिले. ही घटना आज जवळपास चार दशकांपूर्वीची असली तरी अजूनही लोकांच्या मनात भावूकतेने आठवली जाते. पुण्यातील दगडूशेठ गणपती हे श्रद्धेचं केंद्र आहे आणि जया बच्चन यांच्या सोन्याच्या कानांच्या नवसाची कथा त्याला आणखी एक ऐतिहासिक अध्याय जोडते.