Hera Pheri 3: भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ‘हेरा फेरी’ आणि ‘हेरा फेरी २’ नंतर प्रेक्षक तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. पण, जेव्हा सगळं काही सुरळीत सुरू होतं असं वाटत होतं, तेव्हाच या चित्रपटातील एक महत्त्वाचा चेहरा, म्हणजेच परेश रावल यांनी अचानक प्रोजेक्ट अर्ध्यातच सोडल्याचं वृत्त समोर आलं. आणि याच घटनेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजवली. आता अक्षय कुमारने त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमार्फत परेश रावल यांना तब्बल २५ कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे, ज्यामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे.
‘हेरा फेरी 3’च्या सेटवरून थेट कोर्टात
या चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे तिघेही पुन्हा एकत्र येणार असल्याने चाहते अत्यंत आनंदी होते. पण शूटिंग सुरू असतानाच परेश रावल यांनी अचानक चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचं बोललं जात आहे. अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या प्रोडक्शन हाऊसनं त्यांच्यावर ‘अनप्रोफेशनल बिहेवियर’चा आरोप करत कोर्टात २५ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. करार करूनही चित्रपटातून मागे हटणे, आगाऊ मानधन घेणे आणि चित्रपटाच्या सेटवरील खर्च वाया घालवणे हे या नोटीसमागील मुख्य मुद्दे आहेत.
परेश रावल यांची प्रतिक्रिया आणि स्पष्टीकरण
या प्रकरणावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यानंतर परेश रावल यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की त्यांनी ‘हेरा फेरी ३’ सोडण्याचा निर्णय सर्जनशील मतभेदांमुळे घेतलेला नाही. उलट, दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याशी त्यांचे संबंध आदराचे आणि विश्वासाचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी असेही सांगितले की, निर्मात्यांशी त्यांचा कोणताही व्यक्तिगत वाद झालेला नाही आणि त्यांच्या निर्णयामागे कोणताही द्वेष नाही. मात्र, त्यांनी अचानक घेतलेला हा निर्णय चित्रपटासाठी संकट ठरला आहे.
अक्षय–परेश जोडीवर संकट?
‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’, ‘वेलकम’ आणि ‘भूल भुलैया’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल एकत्र दिसले आहेत. त्यांच्या विनोदी केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे. त्यामुळे ‘हेरा फेरी 3’मध्ये त्यांची जोडी पुन्हा पाहायला मिळणार, ही बातमी चाहत्यांसाठी आनंदाची होती. पण आता या कायदेशीर संघर्षामुळे दोघांमध्ये दुरावा आला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे प्रियदर्शन यांच्या आगामी ‘भूत बंगला’ चित्रपटात हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे हे वाद मिटतील का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
या सर्व घडामोडींमुळे ‘हेरा फेरी ३’चा प्रवास सध्या अडथळ्यांनी भरलेला दिसतो. कोर्टाच्या निर्णयावर या चित्रपटाचं भवितव्य अवलंबून आहे. परेश रावल नोटीसला काय उत्तर देतात, निर्माते पुढे कोणते पाऊल उचलतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राजू, श्याम आणि बाबू भैय्या हे त्रिकूट पुन्हा एकत्र येणार की प्रत्येकजण आपापल्या वाटेने जाणार? हे प्रकरण चित्रपटाच्या पडद्यापेक्षा मोठं बनलं आहे, हे नक्की.