Chhattisgarh Panchayat Polls: मतदान हा आपल्या अधिकारांपैकी एक महत्त्वाचा अधिकार आहे. परंतु, स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त केरळपेंडा गावातील (Kerlapenda Village) लोकांनी पहिल्यांदाच मतदान केले. रविवारी पंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान हा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. याआधी या गावातील लोकांनी कधीही मतदान केले नव्हते.
केरळपेंडाच्या एका रहिवाशाने माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी पहिल्यांदाच मतदान केले आहे. 'आम्ही यापूर्वी कधीही मतदान केले नव्हते.' दुसऱ्या एका रहिवाशाने सांगितले की, 'या निवडणुकीत पहिल्यांदाच गावकऱ्यांना राजकीय नेत्यांसमोर त्यांच्या मागण्या मांडण्याची संधी मिळाली आहे. 75 वर्षांनंतर येथे मतदान होत आहे. आजूबाजूच्या गावातील लोकही मतदान करण्यासाठी येत आहेत. मला आनंद आहे की आम्ही आता विकासाकडे वाटचाल करू.'
हेही वाचा - महाकुंभाच्या समाप्तीनंतर आकाशात दिसणार अद्भुत दृश्य; आकाशात 7 ग्रह एका सरळ रेषेत येणार, भारतात ते कधी आणि कसे पहायचे?
विशेष म्हणजे विजापूर जिल्ह्यातील बंडखोरीग्रस्त भागातील रहिवाशांनीही मतदानात भाग घेऊन आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं. विजापूरमध्ये काही दिवसांपूर्वी 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. आता या भागातील रहिवाशांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन, गावकऱ्यांनी केवळ लोकशाहीवरील विश्वासच व्यक्त केला नाही तर विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची त्यांची इच्छा देखील व्यक्त केली.
हेही वाचा - 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांना वॉशरूमला जाण्यासाठी घ्यावी लागेल HR कडून परवानगी! काय आहे Toilet Break Policy? जाणून घ्या
गावकऱ्यांनी मतदानासाठी केला 70 किलोमीटरचा प्रवास -
गुरुवारी त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, बंडखोरीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या विजापूर जिल्ह्यातील सेंद्रा गावासह राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात येणाऱ्या पाच गावांमधील शेकडो संभाव्य मतदारांनी गोळ्यांऐवजी मतपत्रिकेवर विश्वास व्यक्त केला आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. सुमारे 70 किलोमीटर अंतर कापून, गावकऱ्यांनी लोकशाहीवरील त्यांचा विश्वास दाखवला. घनदाट जंगले, नद्या आणि ओढे अशा कठीण प्रदेशातून प्रवास करून, मतदारांनी आपलं कर्तव्य पार पाडलं.