दिंडोरी : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपासाठी एक दुःखद बातमी आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे गुरुवार १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, येथेही त्यांनी पदे भूषवली, दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी एअर अँब्युलन्सने ते दिल्ली येथे गेले होते. भाजपाने २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी दिली नव्हती. पण ते निष्ठेने भाजपात राहून काम करत होते.
हरिश्चंद्र चव्हाण यांनी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांनी भारती पवार यांचा पराभव केला होता. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. दरम्यान, २०१९ मध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या. त्यानंतर भाजपाने हरिश्चंद्र पवार यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी १ लाख ९८ हजार ७७९ मतांनी विजय मिळवला होता. यानंतर २०२४ मध्ये पुन्हा भारती पवार यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाली. यामुळे नाराज झालेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंड केले होते. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. पण आजारी असल्यामुळे अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेऊन त्यांनी भाजपाचेच काम करणार असल्याचे जाहीर केले होते. नाशिकच्या पिंपळगाव येथे लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत देखील हरिश्चंद्र चव्हाण यांनी हजेरी लावली होती. पण विधानसभेसाठीच्या रणधुमाळीवेळी आजारपणामुळे त्यांना मर्यादा आल्या होत्या. या वातावरणातच त्यांनी गुरुवारी १४ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.