Funny Video Viral : पूर्वीपासूनच लोकांना, विशेषतः सासऱ्याला जावई म्हणजे आपल्या कुंडलीतला 'दहावा ग्रह' वाटत असायचा. हा जावई कधी काय मागणी करेल आणि कशासाठी अडून बसेल, काही सांगता येत नाही. मात्र, हल्ली काळ बदलल्यामुळे अशा जावयांची संख्या कमी झाली आहे. तरीही एखाद-दुसरा अस्सल जावयाचे रंग असलेला जीव गाठ पडतोच.. नसेल, तर त्याचे नातेवाईक तरी त्याला तसा रंग देतातच. मग, कधी पर्याय नाही म्हणून, तर कधी हौसेने अशांचा 'मान' राखला जातो आणि आपली 'मान' त्यांच्या तावडीतून सोडवून घेतली जाते.
तर, अशाच एका नवरदेवानं हेलिकॉप्टरमधून एन्ट्रीची इच्छा व्यक्त केली होती. तसे, भारतीय सासरेही काही कमी नाहीत बरं.. अशाच जावयाची मर्जी सांभाळण्यासाठी एका सासऱ्यानं भन्नाट जुगाड केला. जुगाड म्हटलं की आपण सगळे टवकारून ऐकायला, पहायला लागतो. जुगाडू आपल्या गळ्यातले ताईत आहेत आणि आपल्या देशाची शान आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, त्यांनी असं केलं तरी काय? तर त्यांनी थेट कारला हेलिकॉप्टरसारखं बनवलं आणि त्यातून नवरदेवाची एन्ट्री घेतली. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.
हेही वाचा - आता याला हौशी म्हणायचे की मूर्ख? नशीब मगरीने 'दोन पायांच्या मोठ्या माशाला' नाही गिळलं!
जुगाड करण्यात भारतीय लोक इतके पटाईत आहेत की, नाद करायचा नाय..! अगदी साध्या वाटणाऱ्या वस्तूंपासून अशी वस्तू बनवली की, ज्याची इतरांनी कल्पनाही केली नसेल. तर, अशाच एका जुगाडू सासरेबुवांनी जावयाला नाराज करायला नको म्हणून असा जुगाड केला की, जावईही खूश आणि बजेटमध्ये कामही झालं. या डोकेबाज सासऱ्यांनी स्वतःच्या चारचाकी गाडीलाच हेलिकॉप्टरचं रूप दिलं आणि जावयाला स्वतः तयार केलेल्या हेलिकॉप्टरमधून आणलं.
पूर्वीच्या काळी ‘जावई रुसणं’ हा जणू काही एक विधीच असायचा. म्हणजे लग्नाच्या मंडपात ऐन मुहूर्ताच्या वेळी नवरा मुलगा स्कूटर, फ्रीज, टीव्ही किंवा सोन्याचा एखादा दागिना अशा कुठल्याशा महागडया वस्तूसाठी अडून बसत असे. त्याला त्याच्या घरच्या लोकांकडून असे करण्याच्या सूचनाच मिळत असत. यात चुगलीखोर नणंद, खवाट सासू अशी पात्रंही असत. आपल्या घरातल्या आजीकडून अशा अनेक लग्नांच्या कहाण्या ऐकायला मिळतील. खरं तर अडवणूक करण्याच्या या साऱ्या गोष्टी पूर्वनियोजित असत. तेव्हाचा काळ अगदीच वेगळा होता.
हेही वाचा - माकडानं दीड लाखांचा मोबाईल फोन पळवला; 'बिरबलाच्या बुद्धीनं केली युक्ती', व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू
हा व्हिडीओ marathi_memer_2.0 या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करून लोक मस्करी करत आहेत. एका यूजरने लिहिलं, वाह.. एक नंबर, तर आणखी एकानं, 'असंच पाहिजे नवरदेवाला' अशी प्रतिक्रिया दिली आहे.