Sunday, September 07, 2025 05:00:11 PM

Ganesh Visarjan 2025: लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर; अखेर समोर आलं खरं कारण

मुंबईच्या गणेशोत्सवाला विशेष ओळख देणारा आणि सर्वात मानाचा समजला जाणारा लालबागचा राजा यंदाही विसर्जनाच्या वेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.

ganesh visarjan 2025 लालबागच्या  राजाच्या विसर्जनाला उशीर अखेर समोर आलं खरं कारण

मुंबई: मुंबईच्या गणेशोत्सवाला विशेष ओळख देणारा आणि सर्वात मानाचा समजला जाणारा लालबागचा राजा यंदाही विसर्जनाच्या वेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. तब्बल 22 तासांच्या जल्लोषात, ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत ही मिरवणूक अखेर चौपाटीवर पोहोचली. परंतु सकाळी आठ वाजताच्या सुमारास मूर्ती किनाऱ्यावर दाखल झाल्यानंतरही जवळपास दोन तास विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे चौपाटीवर जमलेल्या भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला  बाप्पा समुद्रकिनारी का थांबले आहेत?

भरतीमुळे अडथळा

या विलंबामागचं मुख्य कारण भरतीचे बदललेले वेळापत्रक असल्याचं समोर आलं आहे. सकाळच्या वेळेस समुद्राचे पाणी वेगाने वाढत होते. मूर्ती विसर्जनासाठी वापरला जाणारा तराफा आणि मूर्ती ठेवलेला पाट हे समुद्राच्या जोरदार लाटांमुळे स्थिर राहत नव्हते. परिस्थिती इतकी बिकट झाली की मूर्तीचा पाट समुद्रात तरंगू लागला. सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जनाची प्रक्रिया थांबवण्याशिवाय आयोजकांकडे दुसरा पर्याय उरला नाही.

कोळी बांधवांचे प्रयत्न

गिरगाव चौपाटीवर अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर स्थानिक कोळी बांधवांनी पुढाकार घेतला. दीड तासाहून अधिक वेळ त्यांनी समुद्राच्या लाटांवर नियंत्रण ठेवत मूर्ती आणि तराफा सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु समुद्राचा जोर इतका प्रखर होता की त्यांचे प्रयत्न वारंवार अपयशी ठरत होते. अखेर भरती ओसरल्यानंतरच विसर्जन प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाविकांची प्रचंड गर्दी

लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रचंड गर्दी उसळली होती. चौपाटीवर रस्त्याच्या दुभाजकांवर, इमारतींच्या छतांवर आणि बाल्कनींमध्ये बसून लोकांनी हा क्षण टिपण्यासाठी तासन्‌तास थांबून राहिले. समुद्रकिनाऱ्यावरही भक्तांच्या लोंढ्यामुळे पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. विसर्जन उशीराने होत असलं तरी भक्तांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झाला नव्हता. "बाप्पा समुद्रात कधी जाईल?" याची प्रतीक्षा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

22 तासांची मिरवणूक

लालबागमधून निघालेल्या या मिरवणुकीला सुरुवातीपासूनच प्रचंड उत्साह लाभला होता. तेजुकाया, गणेश गली, काळाचौकी अशा परिसरातून मार्गक्रमण करत लालबागचा राजा अखेर चौपाटीवर पोहोचला. तब्बल 22 तासांचा हा प्रवास केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिक जल्लोषाचं प्रतीक ठरला. प्रत्येक टप्प्यावर ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि भक्तांच्या "गणपती बाप्पा मोरया"च्या गजराने वातावरण भारावलं होतं.

सकाळी निर्माण झालेल्या अनपेक्षित परिस्थितीमुळे विसर्जन थोडं उशिरा होणार असलं तरी, लाखो भाविक अजूनही त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. मुंबईतील सर्वात मानाचा गणपती समुद्रात विसर्जित होण्याची प्रतिक्षा म्हणजे भक्तांच्या डोळ्यांतील शेवटचं अश्रू आणि हृदयातील अनंत आस्था.

लालबागचा राजा केवळ एक मूर्ती नाही, तर मुंबईकरांच्या श्रद्धेचं, उत्साहाचं आणि एकतेचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही त्याचा निरोप हा अविस्मरणीय ठरणार आहे.

 


सम्बन्धित सामग्री