नागपूर : विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. पण तीन मोठे पक्ष आणि इतर असे मिळून सरकार स्थापन करायचे आहे. यामुळे काही निर्णय घेण्यास आणि समन्वय साधण्यास थोडा वेळ लागत आहे. लवकरच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. राज्यात एक स्थिर सरकार स्थापन होईल; असे संकेत महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची निवडणुकीचा निकाल जाहीर होताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचलाक पदावर नियुक्ती झाली आहे. याआधी त्या राज्याच्या पोलीस महासंचालक होत्या. पण काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेऊन आक्षेप नोंदवले होते. यानंतर निवडणूक आयोगाने निर्देश दिले आणि रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. ही रजा आचारसंहिता संपताच संपुष्टात आली आणि रश्मी शुक्ला यांना पदभार स्वीकारण्याचे निर्देश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले. शुक्ला यांची नियुक्ती ही फडणवीस राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा पहिला संकेत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
रश्मी शुक्ला या फडणवीस यांच्या मर्जीतल्या आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. यामुळे निवडणूक संपताच तातडीने शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश निघताच फडणवीस राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एक नेता उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सहभागी होईल. सर्वाधिक मंत्री भाजपाचे असतील तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना साधारण समसमान मंत्रिपदे देण्याबाबत चर्चा सुरू आहे.
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने महायुतीच्या राज्यातील नेत्यांना मुख्यमंत्री ठरवून त्याचा प्रस्ताव घेऊन दिल्लीत या असे सांगितले आहे. यामुळे पुढील एक - दोन दिवसांत मुख्यमंत्री ठरेल; अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अद्याप याबाबत महायुतीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण सूत्रांकडून आलेले वृत्त महायुतीच्या नेत्यांनी फेटाळलेले नाही.
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल
- एकूण 288 जागा
- महायुती 230 जागांवर विजय
- भाजपा 132 जागांवर विजय
- शिवसेना 57 जागांवर विजय
- राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजय
- महाविकास आघाडी 46 जागांवर विजय
- उद्धव ठाकरे गट 20 जागांवर विजय
- काँग्रेस 16 जागांवर विजय
- शरद पवार गट 10 जागांवर विजय
- इतर 12 जागांवर विजय