छत्रपती संभाजीनगर : समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील किल्लेअर्क येथील समाजकल्याण हॉस्टेलमध्ये आज अचानक पाहणी केली. या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांनी सुविधा न मिळाल्याने काल मोठे आंदोलन केले होते. आंदोलनानंतर मंत्री शिरसाट यांनी तातडीने हॉस्टेलचा दौरा केला आणि परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांना कान उघडणी केली.
मंत्री शिरसाट म्हणाले, "हॉस्टेलमध्ये जवळपास हजार बेड्स असून, पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची अत्यंत कमी व्यवस्था आहे. खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, पलंगांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि विद्यार्थ्यांना पाणी घेऊन सहाव्या मजल्यावर चढावे लागते. अशी परिस्थिती असताना, विद्यार्थ्यांना शिकायला आणि राहायला काय वाईट होईल याचा विचार करा."
अधिकाऱ्यांची जबाबदारी पाहता ते म्हणाले, "तिथल्या चार्ज असलेल्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपासून सुट्टी घेतली आहे, आणि त्यांच्या येण्याची तयारीही नाही. ह्या स्थितीत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल."
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मंत्री शिरसाट यांनी कडवट शब्दात सांगितले, "२.५ वर्षांपासून दुरुस्तीचा प्रस्ताव होता, पण यावर काहीही काम सुरू नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे, अशा अधिकारी आणि व्यवस्थापकांना माफी नाही. महाराष्ट्रातील सर्व समाजकल्याण हॉस्टेल्समध्ये अशीच परिस्थिती असेल, तर त्यावर तातडीने लक्ष दिले जाईल."
मंत्री शिरसाट यांनी वचन दिले की, "२६ तारखेला समाजकल्याण आयुक्त इथे येऊन परिस्थितीची पाहणी करतील. त्यांना कोणतीही त्रुटी राहू देणार नाही. तातडीने निधी दिला जाईल, आणि असं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल."
त्यांनी कडक शब्दांत सांगितले, "इथे सक्षम अधिकारी तातडीने नेमले जातील. ही परिस्थिती असह्य झाली आहे, आणि आता ती बदलण्याची वेळ आली आहे. अशा व्यवस्थेचे तात्काळ पुनर्निर्माण केलं जाईल."