विजय चिडे, प्रतिधिनी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या बालानगर येथे चिंच फोडणीतून नागरिकांना रोजगार मिळत आहे. उन्हाळा सुरू झाला की नागरिकांच्या हाताला चिंच फोडणीचे काम मिळते. त्यातून संसाराला आर्थिक आधार मिळत आहे. फोडणीसाठी प्रति किलो 10 ते 15 रुपये अशी मजुरी दिली जाते. पैठणच्या बालानगर येथे मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे आहेत. चिंचेला तोर लागल्यानंतर शेतकरी चिंचेच्या झाडांची विक्री करतात. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असते. दरम्यान, हे व्यापारी चिंचा झाडून त्या फोडणीसाठी महिलांकडे देतात. चिंच फोडण्यासाठी महिलांना 10 ते 15 रुपये प्रति किलो मजुरी दिली जाते. छत्रपती संभाजीनगरमधल्या अहिल्यानगर बाजारपेठेत चिंचेला 10 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. सध्या दरात घसरण झाली आहे. हैदराबाद येथील बाजारपेठेत चिंचेला 7 ते 9 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. बालानगर येथे मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे आहेत. मागील काही दिवसांपासून दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढला असल्याने बालानगर (ता.पैठण) परिसरात चिंच झोडणीचे काम जोरदार सुरू आहे. चिंच झोडणीच्या कामामुळे परिसरातील ग्रामीण भागातील महिला मजुरांच्या हाताला काम मिळत असून त्यांना पाच किलो चिंच फोडणीसाठी 40 रुपये मिळत आहे. तर यंदा भाव जरा बरा मिळत असल्याने उत्पादकांसाठी चिंच ही गोड आणि तुरट ठरली आहे.
ग्रामीण भागातील महिलांना चिंच फोडणी करण्यासाठी घरपोच चिंच दिली जात असल्याने अनेक महिला घरातील कामं करत चिंच फोडणी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. एक महिला दिवसातून 25 ते 40 किलो चिंच फोडणी करते. त्यामुळे त्यांना 250 ते 400 रुपयेपर्यंत रोजंदारी पडते. यावर्षी पैठण तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून शेतीची कामे नसल्याने शेतमजूर, महिलावर्ग आर्थिक संकटात आहेत. अशातच चिंच फोडणीच्या कामाने महिलांच्या हाताला काम मिळून चार पैशांचा आधार मिळत आहे. पावसाळ्यामध्ये चिंचेच्या झाडांना आलेली फुले पाहून झाडाची किंमत अगोदर ठरविली जाते. चिंच खरेदी करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. दोन-चार झाडे घेणारे व्यापारी चिंचा फोडून गावातील मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. व्यापारी बालानगर (ता.पैठण) येथे फोडलेल्या चिंचा व चिंचोके विकतात. झाडाचा विस्तार, लागलेली फळे-फुले, बहराचे प्रमाण पाहून व्यापारी दर ठरवतात. उत्पादनाचे चांगले वर्षे असेल, तर चांगल्या झाडाला साधारणतः चार हजार रुपयांचा दर ठरतो. फेब्रुवारी ते एप्रिल हा विक्री हंगाम असतो. जून- जुलै महिन्यांत फुले चांगली फुललेली असतात. यामुळे चिंचा किती लगडणार याचा अंदाज येतो. काही व्यापारी फुले असताना तर काही व्यापारी लहान फळे लागल्यानंतर सौदा (व्यवहार) करतात. ज्या शेतकऱ्यांना आर्थिक नड आहे. ते पुढील दोन-तीन वर्षांचाही व्यवहार निश्चित करतात. मात्र यात कमी पैसे मिळण्याची शक्यता असते.
हेही वाचा : हिंसाचारानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता
चार महिने रोजगार
चिंचा झोडण्याचे काम फेब्रुवारीमध्ये सुरू होते. ते मे महिन्यापर्यंत संपते. या चार महिन्यात ग्रामीण भागात मोठी रोजगार निर्मिती होते. शेतीच्या कामांनाही मजुरांची टंचाई भासते. झाडावर चढून बांबूने झोडपून चिंचा खाली पाडणे, जमिनीवर पडलेल्या चिंचा वेचणे, त्यांच्यावरील टरफल बाजूला करणे, चिंचा फोडून गर व चिंचोके वेगळे करणे यासाठी मजूर मोठ्या प्रमाणात लागतात. चिंचा झोडपण्यासाठीच जास्त प्रमाणात मजूर लागतात. त्यांना प्रति दिन 500 रुपये मिळतात. तसेच उचल म्हणून अगोदर पैसे दिले जातात. चिंचा वेचणाऱ्या महिलांना 250 रुपये प्रति दिन मजुरी मिळते. टरफल बाजूला केल्यानंतर चिंचा फोडतात. चिंचेपासून साधारणतः 55 टक्के गर, 14 टक्के चिंचोके व 11 टक्के टरफल व शिरांचे उत्पादन मिळते.
यावर्षी चिंचेस अपेक्षित बाजारभाव मिळत आहे. फोडलेल्या चिंचेस प्रति किलो 70 ते 120 रुपये बाजारभाव मिळत आहे. तर, अखंड चिंचेस 15 ते 55 प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे. तर सरासरी 30 ते 35 रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे. अखंड चिंचेस प्रति क्विंटल 7000 ते 3000 पर्यंत बाजारभाव मिळत आहे. मात्र मजूर टंचाईमुळे चिंच व्यवसायात अडचणी निर्माण होत आहेत. चिंच झोडपणी करताना झाडांच्या फांदीवरून धोकादायक पद्धतीने झोडपणी करावी लागते यासाठी मंजूर टंचाई भासू लागली आहे.
हेही वाचा : नागपूरच्या राड्या मागचा मास्टरमाईंड अखेर सापडला
'चिंचोक्यालाही मागणी'
चिंचेवरील टरफल हे वीटभट्टीसाठी वापरले जातात. तर चिंचोक्याचा उपयोग हा उपयुक्त साहित्य बनविण्यासाठी केला जातो. त्यामुळे बाजारपेठेत चिंचोक्यालाही मागणी असल्याचे चिंचेचे व्यापारी निसार सय्यद यांनी सांगितले.