Sunday, August 31, 2025 05:31:02 PM

धुळे शहरातील चितोड रस्त्याची चाळण;अनेक दुचाकीस्वारांचे अपघात

सध्या राज्यभरात रस्त्याची विकासकामे सुरु आहेत. नुकताच धुळे शहरातील चितोड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून याकडे संबंधित यंत्रणा मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे.

धुळे शहरातील चितोड रस्त्याची चाळणअनेक दुचाकीस्वारांचे अपघात

धुळे: सध्या राज्यभरात रस्त्याची विकासकामे सुरु आहेत. मात्र रस्त्यांच्या कामांना विलंब होत असल्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत. नुकताच धुळे शहरातील चितोड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून याकडे संबंधित यंत्रणा मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे, आता या रस्त्यावर धावणाऱ्या डंपरसारख्या अवजड वाहनांची वाहतूक तत्काळ बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

स्त्याच्या कामांमुळे प्रवाशांचे हाल:

बारीक खडी आता मुख्य रस्त्यावरून थेट रस्त्याच्या कडेला आली आहे. अशातच रस्त्यावर दगडांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कॉलनीतील नागरिकांना पायी चालणे अवघड झाले आहे. प्रवाशांची दुचाकी स्लीप होणे किंवा छोटे-मोठे अपघात सतत होत आहेत. सध्या किरकोळ अपघात सातत्याने घडत आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड असल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने वारंवार पंक्चर होत आहेत. मात्र या सगळ्या घटकांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

रहिवाशांचा संताप:

रस्त्यावर असलेल्या बारीक खडीमुळे आणि जास्त प्रमाणात होणाऱ्या धुळीच्या त्रासामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या प्रमुख रस्त्यांवर सुमारे 26 कॉलनीतील रहिवाशी राहत आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून येथील रहिवासी रस्त्यांच्या समस्येने त्रस्त आहेत. याबद्दल इथल्या रहिवाशांनी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र अजूनही या समस्या तसेच आहेत, असे श्री. माळी यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचारांमुळे रस्ते अजूनही 'जैसे थे':

सध्या, धुळे महानगरपालिकेमध्ये रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. आताच्या आणि पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांच्या मर्जीच्या कंत्राटदारांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भ्रष्टाचार करण्यासाठी नवनवीन उपायदेखील काढले आहेत. 'नवीन रस्ते किंवा अपूर्ण स्थितीत असलेल्या रस्त्यांचे टेंडर पुन्हा काढून त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार कसा करता येईल, त्यासाठी विविध उपाय वापरले जात आहेत', असा आरोप श्री. माळी यांनी प्रशासनावर खोचक टीका केली आहे. 'नवतेज बाजाराजवळील आणि धरती कॉलनीतील दोन्ही रस्त्यांची सुमारे २३ टक्के बिले अदा केल्यानंतरदेखील रस्त्यांची कामे अर्धवट का आहेत?' असा प्रश्न श्री. माळी यांनी उपस्थित केला आहे.


सम्बन्धित सामग्री