जळगाव: आशादीप शासकीय महिला वस्तीगृहातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, वस्तीगृहात राहणाऱ्या गतिमंद मुलीला दुसऱ्या मुलीकडून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही घटना घडून 7 दिवस उलटल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर उघड झाली आहे.
किरकोळ वादातून ही मारहाण झाल्याची माहिती असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वस्तीगृहात तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली.
हेही वाचा: 'मला काहीच आश्चर्य...; इम्तियाज जलील यांचा शिरसाठांवर घणाघात
या चौकशीदरम्यान आणखी गंभीर बाबी समोर आल्या आहेत. वस्तीगृहाच्या अधीक्षिका सोनिया देशमुख यांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. याबाबतचा अहवाल महिला व बाल विकास आयुक्तांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रफिक तडवी यांनी दिली आहे.
या प्रकरणातील निष्काळजीपणाचं हे पहिलं उदाहरण नाही. याच वस्तीगृहातून एप्रिल महिन्यात एका बांगलादेशी तरुणीचा पलायन झालं होतं. तिचा अद्यापही शोध लागलेला नाही. याशिवाय, एका तरुणीला बेकायदेशीरपणे दोन दिवस बाहेर राहण्याची परवानगी दिली गेली होती, याबाबतही अधीक्षिका सोनिया देशमुख यांनी उच्च अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिली नव्हती.
हेही वाचा: Panvel: शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर
तसेच बलात्कार पीडित तरुणीचं नाव सार्वजनिक केल्याचा गंभीर आरोपही सोनिया देशमुख यांच्यावर करण्यात आला आहे.
या घटनांमुळे वस्तीगृहातील सुरक्षेविषयी, महिला आणि मुलींच्या हक्कांविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले असून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने आता या प्रकरणात कडक पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा महिला वस्तीगृहातील मुलींच्या सुरक्षेवर कायमच प्रश्नचिन्ह राहील.