Thursday, September 04, 2025 02:52:54 PM

मुंबईतील 'या' सहकारी बँकेवर RBI कडून निर्बंध; पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर ठेवीदारांच्या रांगा

आरबीआयने म्हटले आहे की, 13 फेब्रुवारी 2025 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून, बँक पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करणार नाही, कोणतीही गुंतवणूक करणार नाही.

मुंबईतील या सहकारी बँकेवर rbi कडून निर्बंध पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर ठेवीदारांच्या रांगा
RBI Imposes Restrictions On New India Co-operative Bank
Edited Image

RBI Imposes Restrictions On New India Co-operative Bank: मुंबईतील न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआय कडून निर्बंध लादण्यात आले आहेत. ठेवीदारांना ठेवी काढण्यास मनाई करण्यात आली असून न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देऊ शकणार नाही किंवा  ठेवीदेखील स्वीकारू शकणार नाही. तसेच ही बँक आता पुढील सहा महिने कोणतेही व्यवहार करू शकणार नाही. आरबीआयच्या या निर्णयानंतर आता बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या लांबचं लांब रांगा लागल्या आहेत. आरबीआयने म्हटले आहे की, 13 फेब्रुवारी 2025 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून, बँक पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करणार नाही, कोणतीही गुंतवणूक करणार नाही आणि नवीन ठेवी स्वीकारण्यासह कोणतेही दायित्व स्वीकारणार नाही.  

हेही वाचा- कोल्हापूरमध्ये अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश;तीन महिलांना अटक

मुंबईतील अंधेरी येथील विजयनगर शाखेबाहेर खातेदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. ग्राहकांना त्यांचे पैसे कधी मिळतील याबद्दल गोंधळ आहे. काहींनी असेही म्हटले की बँक त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नसून त्यांचे बँकेचे अॅप देखील काम करत नाहीये. ठेवीदारांकडून प्रचंड संताप व्यक्त केला आहे. सर्वसामान्य माणूस ज्या वेळेला पैसे सुरक्षित ठेवण्याचा विचार करतो, तेव्हा त्याच्यासमोर बँक हा एकमेव सुरक्षित पर्याय असतो. परंतु, अचानक बँकेसंदर्भातील या निर्बंधामुळे खातेदारांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.  

बँकेबाहेर जमलेले बहुतेक लोक ज्येष्ठ नागरिक आहेत. बँक अधिकाऱ्यांनी रांगेत उभ्या असलेल्यांना कूपन दिले आहेत. त्यांच्या मते, ग्राहक त्यांच्या लॉकरमध्ये प्रवेश करण्यासाठी या कूपनचा वापर ते करू शकतात. बँकेची सध्याची स्थिती लक्षात घेता, बँकेला बचत बँक किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे आरबीआयने म्हटले आहे. 

हेही वाचा- अभ्यासक्रमात क्रिकेटचा समावेश होणार

दरम्यान, ज्या खातेदारांचे बँकेत लॉकर आहेत, त्यांचे पैसे ते काढू शकतात. त्यामुळे अनेकांनी बँकेच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. अनेक खातेदारांच्या घरातील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पैशांची गरज असल्याने गर्दी केली असून या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी शाखेबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री