Kim Jong Un Viral Video : चीनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या भेटीनंतर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, किम जोंग उन यांचे कर्मचारी त्यांच्या उपस्थितीचे सर्व खुणा पुसताना दिसत आहेत. किम ज्या खुर्चीवर बसले होते त्या खुर्चीचा आर्मरेस्ट, गादी आणि अगदी टेबल देखील काळजीपूर्वक पुसण्यात आला होता, तर त्यांनी वापरलेला ग्लास एका खास ट्रेवर ठेवून नेण्यात आला.
रशियन पत्रकार अलेक्झांडर युनाशेव यांनी त्यांच्या युनाशेव लाईव्ह चॅनेलवर म्हटले आहे की, चर्चा संपल्यानंतर, किम यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उपस्थितीच्या सर्व खुणा काळजीपूर्वक पुसून टाकल्या. त्यांनी पाण्याचा ग्लास काढून घेतला आणि किम यांनी स्पर्श केलेल्या खुर्चीचे आणि फर्निचरचे भाग देखील साफ केले.
सुरक्षेबाबतच्या अटकळी
या फॉरेन्सिकसारख्या स्वच्छतेमागील कारण स्पष्ट नाही. रशियन गुप्तचर संस्था किंवा चीनकडून पाळत ठेवली जाण्याच्या शक्यतेमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचा अंदाज लावला जात आहे. असे मानले जाते की, किम हे एकमेव नेते नाहीत जे त्यांच्या जैविक खुणांबाबत इतके सावध आहेत.
हेही वाचा - Putin On Multipolar System: जग बहुध्रुवीय असले पाहिजे, कोणीही वर्चस्व गाजवू नये; पुतिन यांचे आवाहन
पुतिन हेही त्यांच्या डीएनएचे संरक्षण करण्यासाठी देखील कठोर पावले उचलतात
वृत्तांनुसार, परदेश दौऱ्यांदरम्यान पुतिन त्यांच्या डीएनएचे संरक्षण करण्यासाठी देखील खूप कठोर पावले उचलतात. असे म्हटले जाते की, त्यांचे अंगरक्षक त्यांचे मूत्र आणि विष्ठा विशेष पिशव्यांमध्ये मॉस्कोला परत घेऊन जातात जेणेकरून कोणत्याही शत्रू देशाला त्यांच्या आरोग्याची माहिती मिळू नये. ही प्रक्रिया 2017 पासून सुरू असल्याचे सांगितले जाते.
किम जोंग यांची चीन आणि रशियाशी जवळीक वाढली
यादरम्यान, किम जोंग उन यांनी पुतिन यांना आश्वासन दिले की, ते रशिया आणि त्यांच्या लोकांसाठी सर्वतोपरी सहकार्य करतील. दोन्ही नेत्यांनी चहापानादरम्यान अनौपचारिक चर्चादेखील केली. वृत्तांनुसार, उत्तर कोरियाने रशिया-युक्रेन युद्धात आपले सैनिक पाठवले आहेत, ज्यापैकी सुमारे 2000 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोविडच्या साथीनंतर किम यांची ही पहिलीच चीन भेट होती. या निमित्ताने त्यांना पुतिन आणि शी जिनपिंग तसेच 20 हून अधिक देशांच्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळाली. 2024 मध्ये झालेल्या संरक्षण करारानंतर, रशिया आणि उत्तर कोरियामधील जवळीक आता अनेक दशकांमधील सर्वोच्च पातळीवर मानली जात आहे.
हेही वाचा - Vladimir Putin : भारत, चीनवरील निर्बंधांच्या अमेरिकेच्या धोरणावर पुतिन यांची सडकून टीका; म्हणाले 'वसाहतवादी युग आता संपलंय...'