Sunday, August 31, 2025 11:45:59 AM

परभणीच्या घटनेचे हिंगोलीत पडसाद

परभणीतील घटनेचे पडसाद हिंगोलीत उमटताना दिसत आहेत.

परभणीच्या घटनेचे हिंगोलीत पडसाद

हिंगोली : परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्यामुळे परभणीतील आंबेडकरांच्या अनुयायांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली. परभणीतील या घटनेला हिंसक वळण लागले असताना त्याचे पडसाद हिंगोलीत उमटताना दिसत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये कडकडीत बंद करण्यात आला आहे. मात्र या बंदाला पोलिसांची परवानगी नाही. व्यापाऱ्यांनी स्वयंघोषित बंद केला आहे. त्यामुळे हिंगोली शहरातही ठिकठिकाणी पोलिसांनी बंद केला आहे. संविधानाची प्रत फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंगोलीत आंबेडकरांच्या अनुयायांकडून होत आहे.

 

परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेले भारताचे संविधान एका आज्ञात व्यक्तीकडून फोडल्याच्या घटनेचे पडसाद  हिंगोलीतील वसमत येथे उमटले आहेत.  या घटनेनंतर आंबेडकरी जनता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.  डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहराच्या प्रमुख मार्गाने भव्य आक्रोश मोर्चा काढत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी घोषणाबाजी करत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी होते. या मोर्चाला पोलिसांचा चोक बंदोबस्त होता.

परभणीत नेमकं काय झालं ?

परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असणाऱ्या परिसरात एका व्यक्तीकडून संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली. यामुळे आंबेडकर अनुयायी प्रचंड संतप्त झाले. आंबेडकरांचे अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसरात जमा झाले. त्यानंतर त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त आंदोलकांनी पाईप पेटवले. दुकानाबाहेरील साहित्य आणि बोर्डची तोडफोड केली. एवढेच नाही तर जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक देखील करण्यात आली. परभणीतील बंदाला हिंसक वळण आले आहे. परभणी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. आंदोलकांनी दुकानं आणि वाहनांवर दगडफेक केल्याने आंदोलक आणि पोलिस आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.


सम्बन्धित सामग्री