मुंबई: बुधवारी दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे, शिवसैनिक आणि मनसैनिक आक्रमक आहेत. नुकताच, मनसे नेते अविनाश जाधवांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 'कॉफी विथ कदम' ला मुलाखत दिली. यादरम्यान, अविनाश जाधव यांनी इशारा दिला की, 'जर 24 तासात कारवाई झाली नाही तर तर मनसे स्टाईलने आंदोलन करू'.
हेही वाचा: Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन
अविनाश जाधव काय म्हणाले?
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या संपादिका वृषाली कदम परब यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना सवाल केला. 'दादरमध्ये जी घटना घडली आहे, मॉंसाहेबांच्या पुतळ्यावर रंग टाकला गेला. त्यांनतर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेदेखील त्याठिकाणी उपस्थित झाले. मुळात अशा ज्या घटना घडतात, त्या मानसिकतेबद्दल तुम्ही काय सांगाल?'.
यावर, मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली की, 'मॉंसाहेबांनी तर घरात येणाऱ्या प्रत्येकांचा पाहुणचार केला. असं म्हटलं जातं की, घरात आलेला माणूस खाल्याशिवाय घराबाहेर नाही पडला. मॉंसाहेबांचा काय दोष आहे ओ? त्यांनी सुद्धा कधी असं सांगितलं नसेल की माझा पुतळा लावा. लोकांनी प्रेमापोटी तो पुतळा लावला आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा काय दोष आहे की तुम्ही त्यांच्या पुतळ्यावर रंग फेकला? बाजूला शिवतीर्थ होतं थोड्याच अंतरावर. जायचं ना एवढी हिंमत होती तर. दोन मिनिटांवर शिवतीर्थ होतं. जरा पुढे जायचं. पण ही लोकं अतिशय वाईट मानसिकतेचे असतात. तसंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे की 24 तास. बघूया 24 तासांत काय होतं. नाहीतर आम्ही आहोतच. आमच्या बाळासाहेब आणि मॉंसाहेबांवर जर तुम्ही कोणत्याही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर, तुम्हाला महाराष्ट्र सैनिक सोडणार नाही, एवढं नक्की'.