Raj Thackeray: मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाज कंटकांनी रंग फेकल्याची गंभीर घटना समोर आली आहे. सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून पुतळ्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात लाल रंग पडलेला दिसून आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ठिकाणी येऊन परिसराची पाहणी केली आहे.
राज ठाकरेंकडून पुतळ्याची पाहणी
मीनाताई ठाकरे यांचा पुतळा असलेल्या ठिकाणची पाहणी राज ठाकरे यांनी केली. या परिसरात नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली ? याची संपूर्ण माहिती राज ठाकरे यांनी घेतली. राज ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मनसे सचिव सचि मोर यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. यानंतर संपूर्ण माहिती त्यांनी राज ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर राज ठाकरे मीनाताईंच्या पुतळ्याजवळ दाखल झाले. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शाखाप्रमुखांच्या बैठकीआधी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येणार आहेत. उद्धव ठाकरेंनी आधीच आपल्या नेत्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी काय झालं, याची माहिती घेतली आहे.
Meenatai Thackeray : स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; शिवसेना ठाकरे गट आक्रमक
नेमकं घडलं काय?
कोणीतरी सकाळच्या सुमारास मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर शिवसैनिक घटनास्थळी जमले. काही शिवसैनिक पुतळ्याच्या आजूबाजूची साफसफाई करताना दिसले.या घटनेची माहिती मिळताच तातडीने या ठिकाणचे स्थानिक आमदार, खासदार, काही शिवसैनिक परिसरात दाखल झाले. जमलेल्या शिवसैनिकांनी साफसफाई सुरू केले.
ही घटना सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. सकाळी त्या आधी असं काहीच नव्हतं. आजूबाजूचा लाल रंग शिवसैनिकांनी पुसून काढला आहे. शिवसैनिकाने आजूबाजूचा लाल रंग पुसत साफसफाई केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.