Sunday, August 31, 2025 09:11:12 AM

Virat Kohli: निवृत्ती की नवा डाव? विराटच्या तयारीने BCCI बुचकळ्यात

विराट कोहलीच्या निवृत्तीवर चर्चेना उधाण आलं असतानाच त्याने लॉर्ड्सवरून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बीसीसीआय बुचकळ्यात, चाहत्यांत नवा उत्साह.

virat kohli निवृत्ती की नवा डाव विराटच्या तयारीने bcci बुचकळ्यात

Virat Kohli: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठी चर्चा सुरू आहे. टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीबद्दल. क्रिकेट वर्तुळात वारंवार असा सूर ऐकायला मिळतोय की या दोन्ही दिग्गजांना लवकरच निवृत्ती घ्यावी लागेल. मात्र या चर्चांदरम्यान विराट कोहलीने केलेली तयारी आणि त्याचे काही ताजे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण चित्र पालटल्यासारखे दिसत आहे.

खरं तर, सध्या विराट कोहली लंडनमध्ये आहे. नुकतेच सोशल मीडियावर त्याचे लॉर्ड्स मैदानावरील फोटो व्हायरल झाले. त्यात तो नेट्समध्ये घाम गाळताना आणि चाहत्यांना भेटताना दिसतो. इतकंच नव्हे तर त्याच्या खेळावरून स्पष्ट जाणवतंय की कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसून मेहनत घेतोय. त्यामुळे निवृत्तीबद्दलच्या चर्चांवर जणू तो स्वतःच्या खेळीने उत्तर देत आहे.

19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेत विराट आणि रोहित दोघेही खेळताना दिसतील. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोहलीने कसोटी आणि टी-20 क्रिकेटला रामराम ठोकला असला तरी वनडे क्रिकेटमध्ये अजूनही त्याची भक्कम उपस्थिती जाणवते. निवृत्तीच्या चर्चा वाढत असतानाच त्याची मेहनत बीसीसीआयच्या कपाळावर आठ्या उमटवणारी ठरत आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचा युवा फलंदाज स्वस्तिक चिकारा याने अलीकडेच कोहलीबद्दल केलेले वक्तव्यही चर्चेत आहे. त्याने सांगितले की  'विराट भैय्याने मला एकदा सांगितलं होतं, की मी शंभर टक्के फिट असेपर्यंत क्रिकेट खेळणार. मी कधीही अर्धवट खेळाडू म्हणून मैदानात उतरणार नाही. मी सिंहासारखा खेळेन संपूर्ण 20 षटके क्षेत्ररक्षण करेन आणि नंतर फलंदाजी करेन. ज्या दिवशी हे शक्य होणार नाही, त्या दिवशी मी क्रिकेटला अलविदा करेन.'

या विधानावरून एक गोष्ट स्पष्ट होते. कोहली निवृत्तीच्या चर्चांकडे फारसं लक्ष देत नाही. त्याचं लक्ष फक्त तंदुरुस्ती आणि खेळावर आहे. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात सातत्यपूर्ण आणि दमदार फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की त्याचा खेळ अजून संपलेला नाही.

कोहली आणि रोहितची जोडी भारतीय क्रिकेटसाठी किती महत्वाची आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे या दोघांच्या निवृत्तीबाबत येणाऱ्या बातम्या चाहत्यांना धक्का देणाऱ्या ठरत आहेत. मात्र विराट कोहलीने मैदानावर परत घाम गाळायला सुरुवात केल्याने बीसीसीआयलाही आता वेगळं गणित मांडावं लागेल.

सध्या चाहत्यांना फक्त एवढंच पाहायचं आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा त्याच्या क्लासिक खेळीनं प्रतिस्पर्ध्यांना कसं धूळ चारतो. निवृत्तीच्या चर्चा बाजूला ठेवून, विराट कोहली पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटचा “चेस मास्टर” ठरणार का, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.


सम्बन्धित सामग्री