Doomsday fish : जगभरात डूम्स डे फिशची चर्चा! ओअरफिश खरंच आपत्तीचा इशारा देतो का?
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्यावर एक अनोखा मासा वारंवार किनाऱ्यावर येताना पहायला मिळत आहे. चकचकीत चंदेरी रंग, लांबट शरीर आणि खोल समुद्रात राहण्याची सवय असलेल्या या माशाने स्थानिक लोकांना गोंधळात टाकले आहे. स्थानिकांनी त्याला पुन्हा समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला. पण तो मासा परत परत किनाऱ्यावर येत राहिला. हा मासा म्हणजेच ओरफिश. ज्याला ‘डूम्स डे फिश’ म्हणून देखील ओळखलं जातं. या माशाबाबत अनेक गूढ कथा आहेत.
ओरफिश हा समुद्राच्या 250 ते 1000 मीटर खोल भागात राहणारा मासा आहे. त्याची लांबी 8 मीटर ते 17 मीटरपर्यंत वाढू शकते. त्यामुळे तो जगातील सर्वात लांब असलेल्या माशांपैकी एक आहे. तो क्वचितच समुद्र किनाऱ्याजवळ दिसतो. पण जेव्हा दिसतो तेव्हा चर्चेचा विषय ठरतो. जपानी लोक कथांमध्ये त्याला ‘देवतांचा संदेशवाहक’ म्हटलं जातं. कारण तो संकटाचा इशारा देतो, अशी लोकांची श्रद्धा आहे.
2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या भूकंप आणि त्सुनामीपूर्वी तब्बल 20 ओरफिश किनाऱ्यावर आले होते. त्यानंतर 2017 मध्ये फिलीपीन्समध्येही ओरफिश दिसल्यानंतर लगेच 6.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. अशा अनेक घटनांमुळे ओरफिश आणि नैसर्गिक आपत्ती यांचा संबंध जोडण्यात आला आहे. पण 2013 मध्ये कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावरही दोन ओरफिश आढळले. त्यानंतर कोणताही भूकंप झाला नाही किंवा नैसर्गिक आपत्ती आली नाही. त्यामुळे हा केवळ योगायोग आहे की खरोखरच ओरफिश संकटाचा इशारा देतो? याबद्दल मतभेद आहेत.
हेही वाचा - Viral Video: कोरियन वडिलांनी बाळासाठी गायली अंगाई
मेक्सिकोमधील ओरफिश आणि भूकंपाचा संबंध?
9 फेब्रुवारी रोजी मेक्सिकोच्या प्राया एल क्वेमाडो समुद्रकिनाऱ्यावर हा मासा दिसून आला आणि त्यानंतर काही दिवसांत कॅनडाच्या व्हॅनकुवरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे अनेकांनी पुन्हा ओरफिश आणि नैसर्गिक आपत्ती यांचा संबंध जोडण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - OMG! तामिळनाडूमध्ये 13 हजार रुपयांना विकले गेले एक लिंबू; काय आहे खास? जाणून घ्या
शास्त्रज्ञ याबाबत काय म्हणतात?
वैज्ञानिकांच्या मते, ओरफिश हा खोल समुद्रात राहणारा जीव आहे आणि समुद्राच्या तळातील बदलांप्रती संवेदनशील असतो. भूकंपाच्या आधी समुद्राच्या तळाशी होणाऱ्या हालचाली, उष्णतेतील वाढ किंवा दबावातील बदल यामुळे तो वर येत असू शकतो.
बुलेटिन ऑफ द सिस्मोलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकाच्या संशोधनानुसार, ओरफिश आणि भूकंप यांचा थेट संबंध नाही. पण समुद्राच्या तळाशी काहीतरी बदल होत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दरवेळी ओरफिश किनाऱ्यावर आला की भूकंप येईल किंवा नैसर्गिक आपत्ती येईल, असं नाही. हवामान बदल, प्रदूषण, समुद्रातील तापमान वाढ यामुळेही तो वर येऊ शकतो. त्यामुळे तो संकटाचा खरा इशारा आहे की नाही, याबाबत अजूनही गूढ कायम आहे.