नवी दिल्ली : 'लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नीने 'मला स्वतंत्र राहायचं आहे' असं म्हणणं अशक्य आहे, असं मत सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. एका दांपत्याच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली आहे. 'लग्न म्हणजे दोन हृदय आणि दोन व्यक्तीचं एकत्र येणं असतं. त्यात तुम्ही असं म्हणता की ''मी स्वतंत्र राहीन'' असं म्हणणं चुकीचं आहे. जर एखाद्याला कोणाला पूर्ण स्वातंत्र्य हवे असेल तर, त्याने लग्नच करू नये', एका दांपत्याच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा: Flower Rate In Ganeshotsav 2025 : ऐन गणेशोत्सवात फुलं महागणार ? जाणून घ्या अपेक्षित दर
सध्या विभक्त राहणाऱ्या या दंपत्याला दोन अल्पवयीन मुले आहेत. यावर सुप्रीम कोर्ट म्हणाले की, 'जर हे जोडपे पुन्हा एकत्र आले, तर सर्वात मोठा आनंद तुमच्या मुलांनाच होईल. लहान मुलांनी कधीही तुटलेलं घर पाहू नये'. सुनावणीदरम्यान पत्नीने सांगितले की, 'पतीचे वर्तन चांगले नसल्यामुळे मी त्याच्यासोबत सिंगापूरमध्ये राहू शकत नाही'. सध्या ती मुलांसह हैदराबादमध्ये राहते आणि स्वत:च्या खर्चासाठी नोकरी करते. तिने पोटगी मिळत नसल्याचीही माहिती दिली. तर दुसरीकडे पतीच्या वकिलाने सांगितले की, 'दोघांनाही सिंगापूरमध्ये चांगल्या नोकऱ्या आहेत, तरी पत्नी परत जायला तयार नाही'. अखेर, सुप्रीम कोर्टाने दोघांनाही शांततेत प्रश्न मिटवण्याचा सल्ला दिला. 'प्रत्येक नवरा-बायकोमध्ये वाद होतात, पण त्यावर तोडगा निघालाच पाहिजे. तुम्ही दोघेही सुशिक्षित आहात, त्यामुळे हा प्रश्न तुम्हालाच सोडवावा लागेल', असा सल्ला सुप्रीम कोर्टाने या दंपत्याला दिला.