Sunday, August 31, 2025 02:09:39 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार सिंदूर उड्डाणपुलाचे लोकार्पण

सिंदूर (कर्नाक) उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण, पूर्व-पश्चिम वाहतूक सुरळीत, वाहतूक कोंडीसह अनेक भागांना दिलासा मिळणार आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार सिंदूर उड्डाणपुलाचे लोकार्पण

मुंबई: दक्षिण मुंबईतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी वाहतूक सुविधा; सिंदूर उड्डाणपुलाचे (पूर्वीचे कर्नाक पूल) लोकार्पण गुरुवारी, 10 जुलै रोजी सकाळी 10  वाजता होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरुवात होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सिंदूर पूल हा मुंबई शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीतून जाणाऱ्या या उड्डाणपुलाची एकूण लांबी 328 मीटर आहे. यामध्ये रेल्वे हद्दीतील भाग 70 मीटरचा आहे, तर महापालिका हद्दीतील रस्त्याची लांबी पूर्वेला 130 मीटर व पश्चिमेला 100 मीटर अशी आहे. पूर्वीचा कर्नाक पूल हा 150 वर्षांहून अधिक जुना होता. मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट 2022 मध्ये तो धोकादायक घोषित करून निष्कासनाची प्रक्रिया सुरु केली. यानंतर सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने हाती घेण्यात आले. केवळ दोन वर्षांत, म्हणजे 10 जून 2025 रोजी, हा पूल पूर्णत्वास नेण्यात यश आले.

हेही वाचा: पैठण तालुक्यात दोन दुचाकींचा भीषण अपघात; 1 जणं ठार, तर 3 जणं जखमी

सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीमुळे मुंबईच्या दक्षिण भागातील पी. डि' मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव यासारख्या वाणिज्यिक भागांना पूर्व - पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा मार्ग सुलभ झाला आहे. पूल कार्यान्वित झाल्यानंतर पी. डि' मेलो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग आणि शहीद भगतसिंग मार्गाच्या छेदनबिंदूवरील अडथळा दूर होईल.

तसेच, युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूकही अधिक सुलभ होणार आहे. गेली १० वर्षे बाधित असलेली पूर्व - पश्चिम वाहतूक आता या पुलामुळे सुरळीत होणार आहे. नागरिकांसाठी दोन्ही दिशेने वाहतूक खुली करण्यात आली असून यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री