Who is Rishikesh Takale: मुंबईत विधानभवनाच्या परिसरात नुकत्याच घडलेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणात समोर आलेलं नाव म्हणजे ऋषिकेश टकले; गोपीचंद पडळकर यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखला जाणारा कार्यकर्ता.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील पाचवा मैल येथील रहिवासी असलेल्या ऋषिकेश टकलेने गेल्या काही वर्षांपासून पडळकरांच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतला आहे. कोणत्याही आंदोलनात, प्रचारात किंवा दौऱ्यात तो त्यांच्यासोबत दिसतो. याच ओळखीतून तो अधिवेशनासाठी देखील मुंबईत आला होता आणि विधानभवन परिसरात घडलेल्या वादात त्याचे नाव समोर आले.टकले फक्त कार्यकर्ता म्हणून नव्हे तर हिंदुस्तान शिवमल्हार संघटना या स्थानिक संघटनेचा सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. संघटनेच्या माध्यमातून तो काही ठिकाणी वादग्रस्त घटनांत सहभागी झाल्याचा आरोप आहे.
हेही वाचा: Vidhan Bhavan Clash: विधानभवनाच्या लॉबीत गोंधळ; पडळकर-आव्हाड समर्थकांमध्ये हाणामारी
त्याचा गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील गंभीर आहे. 2013 साली पलूस पोलीस ठाण्यात त्याच्यावर मारहाण व गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर 2021 मध्ये भिलवडी येथे विनयभंग, सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि हाफ मर्डरच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात झालेली घटना केवळ राजकीय वादापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिचा गंभीर परिणाम संपूर्ण राज्यभर उमटला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.
विशेष म्हणजे, गोपीचंद पडळकर यांनी स्वत: ऋषिकेश टकले हा आपला कार्यकर्ता असल्याचे मान्य केले आहे आणि घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर विधानभवन परिसरातील सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.