मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे. देशी गायींना सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचाही निर्णय झाला आहे.
भारतीय संस्कृतीत गायीला गोमातेचा दर्जा देण्यात आला आहे. आहारात दुधाला महत्त्व आहे. आयुर्वेद, पंचगव्य उपचार, जैविक शेती या सगळ्यात गायीला महत्त्व आहे. देशी गायीचे शेण आणि गोमूत्र यांनाही महत्त्व आहे. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने देशी गायीला राज्यमातेचा दर्जा दिला आहे.
गाय हा शेतकऱ्यांना मिळालेल आशीर्वाद आहे. यामुळे देशी गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांसाठी हिताचा ठरणार आहे. देशी गायींना सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना गायींचा सांभाळ करण्यासाठी, गायींच्या चाऱ्यासाठी आर्थिक मदत देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.