Wednesday, September 03, 2025 12:23:44 PM

तुर्कीचा पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा? तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानच्या कराची बंदरात दाखल

तुर्की-पाकिस्तान लष्करी जवळीक भारतासाठी चिंतेची; कराचीत युद्धनौका, शस्त्रसाठा पाठवला, काश्मीरवर तुर्कीची भारतविरोधी भूमिका ठळक

तुर्कीचा पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानच्या कराची बंदरात दाखल

नवी दिल्ली: तुर्की आणि पाकिस्तान यांच्यातील वाढती घनिष्ठता हे भारताच्या दृष्टीने चिंतेचे कारण ठरत आहे. अलीकडेच तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानच्या कराची बंदरात दाखल झाली असून, यामुळे दक्षिण आशियात सामरिक समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीचा पाकिस्तानला मिळालेला पाठिंबा उघडपणे समोर येत आहे.

याआधीही तुर्कीनं पाकिस्तानमध्ये एक विशेष मालवाहू विमान पाठवले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या विमानातून शस्त्रसाठा पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आला. हे केवळ आर्थिक किंवा मानवी मदतीसाठी नव्हते, तर तांत्रिक आणि लष्करी मदत असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे तुर्की-पाकिस्तान संबंध अधिक सामरिक स्वरूपाचे होत असल्याचे स्पष्ट होते.

भारतासाठी ही बाब केवळ शेजारी राष्ट्राच्या धोरणांवरच नाही, तर जागतिक राजकारणातील बदलत्या समीकरणांवरही लक्ष ठेवण्याची गरज निर्माण करते. तुर्कीने काश्मीरविषयी अलीकडच्या काळात अनेकदा भारतविरोधी वक्तव्ये केली आहेत. संयुक्त राष्ट्रांसारख्या मंचावरही पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली आहे. त्यामुळे तुर्कीची भूमिका एकतर्फी आणि भारतविरोधी असल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा: लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत गोंधळ; 2100 रुपये देणे शक्य नाही...संजय शिरसाट यांची स्पष्ट भूमिका

भारतानं मात्र नेहमीच शांतता आणि समन्वयाचे धोरण स्वीकारले आहे. भारताची लष्करी ताकद, आंतरराष्ट्रीय नातेसंबंध, आणि व्यापक धोरणात्मक दृष्टिकोन हे देशाला सुरक्षित ठेवतात. पाकिस्तान आणि तुर्की यांचे संबंध हे अल्पकालीन लाभांसाठी असले तरी दीर्घकालीन सामरिक दृष्टिकोनातून भारत अधिक मजबूत स्थितीत आहे.

या पार्श्वभूमीवर भारताने आपली लष्करी सज्जता वाढवणे, आंतरराष्ट्रीय मंचांवर तुर्कीच्या भूमिकेचा निषेध करणे, आणि नव्या रणनीतिक भागीदारी निर्माण करणे आवश्यक आहे. इस्रायल, फ्रान्स, अमेरिका, आणि जपानसारख्या राष्ट्रांशी भारताचे संबंध अधिक दृढ करून जागतिक राजकारणात आपली उपस्थिती ठाम करणे गरजेचे आहे.

तुर्की-पाकिस्तान युती ही भारतासाठी धोक्याची घंटा असली, तरी भारताच्या सामर्थ्यवान नेतृत्वामुळे देश आपल्या हिताचे रक्षण करण्यात सक्षम आहे. शांतता हवी असेल, तर सामर्थ्य ठेवावेच लागते हे भारत पुन्हा एकदा सिद्ध करेल.


सम्बन्धित सामग्री