नवी मुंबई: गणेश चतुर्थी दिवशी म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईत आंदोलनासाठी निघाले होते. आता ते नवी मुंबईत पोहोचले आहेत. वाशीत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. ताही वेळातच जरांगे आझाद मैदानावर पोहोचणार आहेत.
27 ऑगस्ट रोजी सकाळी मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटीतून मोर्चाला सुरुवात केली. त्यानंतर शहागड फाटा, साष्य पिंपळगाव, आपेगाव, पैठण कमान, पांढरी पुल, गिरी नका, शेवगाव, घोटण, अहिल्यानगर बायपास, नेप्ती चौक, आळेफाटा मार्गे, शिवनेरी किल्ल्यावर पोहोचले. या ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आणि जुन्नर येथे त्यांनी मुक्काम केला. त्यानंतर राजगुरुनगर खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेलनंतर आता वाशीमध्ये स्वागत करण्यात आले. त्यानंतर जरांगेंचा ताफा चेंबूर मार्गे आझाद मैदानावर पोहोचणार आहे. आज मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत.
Manoj Jarange Aandolan: मराठा समाजाचा मोर्चा धडकणार! शहरात मुंबई पोलिसांसह CRPF च्या जवानांचा कडेकोट बंदोबस्त; वाचा नियम आणि अटी
आंदोलनासाठी अटी
मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी दिली आहे. मात्र काही अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत. फक्त 5 हजार आंदोलकांनाच आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली आहे. मुख्य आंदोलकांसह फक्त 5 वाहनांनाच मैदानात परवानगी दिली. फक्त एक दिवस आंदोलनाची परवानगी देण्यात आली. शनिवार, रविवारी आंदोलनाला परवानगी नाही. मोठ्या संख्येनं आलेल्या आंदोलकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. सकाळी 9 ते सायं. 6 पर्यंतच आंदोलनाला परवानगी दिली आहे. वेळ संपल्यानंतर आंदोलकांना मैदान लगेच सोडावं लागणार असल्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
जरांगेंच्या हमीपत्रात काय?
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली होती. पण नंतर काही अटी आणि शर्ती लावून परवानगी देण्यात आली. त्यानंतर आंदोलनाबाबत हमीपत्र दिले. यामध्ये सकाळी 9.30 ते सायं. 5.30 या वेळेतच आंदोलन करणार आहे. कायदा आणि नियमांचं पालन करणार आहे. पोलिसांच्या नियमित संपर्कात राहणार, चिथावणीखोर भाषणं करणार नाही. शासकीय कामात अडथळा निर्माण होणार नाही. जाळपोळीची कृती होणार नाही. आंदोलनस्थळावरून इतरत्र कूच करणार नाही. पांडुरंग मारकांवर पोलिसांशी समन्वयाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे जरांगेंनी सांगितले. पाणी, वैद्यकीय मदत उपलब्ध करू. वाहतुकीत अडथळा येणार नाही याची खबरदारी घेऊ, आंदोलकांची संख्या मर्यादित ठेवणार, ठरलेल्याच ठिकाणी आंदोलन करणार आणि आंदोलकांकडं शस्त्र असणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी हमीपत्रात म्हटले आहे.