मुंबई : मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचं आंदोलन आजपासून सुरू झालं आहे. केवळ एका दिवसापूरतं या आंदोलनाला परवानगी देण्यात आल्यानंतर दिवसाअखेर आणखी एक दिवस या आंदोलनाला परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कालपासूनच मोठ्या संख्येनं राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आंदोलन मुंबईत दाखल होत आहेत. शिवाय आंदोलनाला उद्यापर्यंत परवानगी दिल्यानंतर आज सायंकाळपासून पुन्हा आंदोलक मुंबईच्या दिशेनं कूच करत आहेत. परिणामी, मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वे मार्गावर त्याचा परिणाम होत असून मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक १५-२० मिनिटांनी उशीराने धावत आहे. त्यामुळे सायंकाळी घराच्या दिशेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा : Eknath Shinde : मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'मी मुख्यमंत्री असताना...'
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातही प्रचंड गर्दी झाली. मुंबई, ठाणे, नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागांतून आलेले आंदोलनकर्ते सीएसएमटीवर उतरल्याने रेल्वे स्टेशन परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मध्य रेल्वेच्या गाड्याही काही काळ उशिरा धावू लागल्या. संध्याकाळी गर्दीची वेळ असल्याने गाडीत चढण्यासाठी झुंबड उडाली आहे. वेळेत घरी पोहोचण्याचा प्रवाशांचा प्रयत्न असतो. मात्र आज प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.